हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत हिसार मतदारसंघातून भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ख्यातनाम असलेल्या सावित्री जिंदल या विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपने सावित्री जिंदल यांना उमेदवारीचं तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे सावित्री यांनी अपक्ष उमेदवारी लढवत दणदणीत विजय संपादीत केला आहे. सावित्री जिंदल यांनी काँग्रेसचे उमेदवार राम निवास रारा यांना 20 हजार मतांनी पराभूत केलं आहे. फोर्ब्सच्या आकड्यांनुसार, सावित्री जिंदल यांची सप्टेंबर 2024 पर्यंत 3.65 लाख कोटी रुपयाची संपत्ती होती.
सावित्री जिंदल या जिंदल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी हिसार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात आपल्या बँक खात्यात किती पैसे जमा आहेत, या विषयी माहिती दिली होती. त्या शपथपत्रानुसार, सावित्री जिंदल यांच्या बँक खात्यात 4.09 कोटी रुपये जमा आहेत. त्यांच्याकडे 165 कोटी रुपयांचे शेअर आणि जवळपास 20 कोटी रुपयांचे दागिने आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे जवळपास 80 कोटी रुपयांची शेतजमीन आहे.
सावित्री जिंदल यांचे पुत्र खासदार नवीन जिंदल यांनी मार्च महिन्यात भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी कुरुक्षेत्र येथून लोकसभा निवडणूक लढवत विजय संपादीत केला होता. नवीन जिंदल यांनी भाजपाच प्रवेश करताच तीन दिवसांनी माजी मंत्री सावित्री जिंदल यांनी भाजपात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीवेळी भाजप आपल्याला उमेदवारीचं तिकीट देईल, असं सावित्री जिंदल यांना वाटलं होतं. पण पक्षाने माजी खासदार तथा मंत्री डॉ. कमल गुप्ता यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारीची संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या सावित्री जिंदल यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा आता विजय झाला आहे.
सावित्री जिंदल यांची हिसार विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, जजपा आणि आपच्या उमेदवारांसोबत लढाई होती. त्या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार कमल गुप्ता यांना पक्षाने पुन्हा संधी दिली होती. तर काँग्रेसकडून राम निवास रारा हे उमेदवार होते. तर जजपाकडून रवि अहूजा आणि आम आदमी पक्षाकडून संजय सतरोदिया उमेदवार होते. अखेर या मतदारसंघाचा निकाल आता समोर आला आहे. सावित्री जिंदल यांचा तब्बल 20 हजार मतांनी विजय झाला आहे.