Haryana Exit Poll 2024: हरियाणात भाजपला मोठा झटका, 10 वर्षानंतर काँग्रेसची सत्ता

| Updated on: Oct 05, 2024 | 7:25 PM

हरियाणात आज मतदान पार पडले. मतदान संपताच वेगवेगळ्या चॅनेलचे एक्झिट पोल जाहीर होऊ लागले आहेत. हरियानामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती. आम आदमी पक्षाची काँग्रेससोबत युतीसाठी चर्चा फिस्कटल्याने युती होऊ शकली नव्हती. इतर छोट्या पक्षांनी देखील येथे निवडणूक लढवली होती. आता एक्झिट पोलनुसार राज्यात कोणाचं सरकार येणार जाणून घेऊयात.

Haryana Exit Poll 2024: हरियाणात भाजपला मोठा झटका, 10 वर्षानंतर काँग्रेसची सत्ता
Follow us on

हरियाणाच्या सर्व 90 विधानसभा जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता ८ ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. पण आज निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर वेगवेगळे एक्झिट पोल समोर येताना दिसत आहेत. ज्यामध्ये हरियानामध्ये भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. या एक्झिटपोलनुसार १० वर्षानंतर काँग्रेस सत्तेत येताना दिसत आहे. एक्झिट पोलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नजर टाकल्यास हरियाणात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होती.

निवडणुकीच्या सुरुवातीला काँग्रेस आणि आप यांच्यात युतीसाठी चर्चा सुरु होती, पण युती होऊ शकली नाही. हरियाणामध्ये काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीशिवाय जेजेपीही निवडणुकीच्या रिंगणात होती. जेजेपीने चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षासोबत युती केली आहे. तर INLD ने मायावतींच्या बसपाशी हातमिळवणी करून निवडणूक लढवली होती.

ध्रुव रिसर्च – एक्झिट पोलनुसार 10 वर्षांनंतर हरियाणात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे दिसून आले आहे. काँग्रेस पक्षाला राज्यात 57 जागा मिळताना दिसत आहेत. त्याचवेळी 90 जागा असलेल्या राज्यात भाजपला 27 तर इतरांना 6 जागा मिळताना दिसत आहेत.

मॅट्रीस एक्झिट – पोलनुसार हरियाणामध्ये काँग्रेस सरकार स्थापन करत असल्याचे दिसते. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 55-62 जागा, भाजपला 18-24 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना 2-8 जागा मिळतील, तर INLD आघाडीला 3-6 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

दैनिक भास्कर- राज्यात भाजपला 15-29, काँग्रेसला 44-54 जागा मिळताना दिसत आहेत. जेजेपी आघाडीला 1 जागा, INLD आघाडीला 1-5 जागा आणि इतरांना 4-9 जागा मिळताना दिसत आहेत.

पीपल्स पल्स एक्झिट पोल – नुसार भाजपला 20-32 जागा, काँग्रेसला 49-61 तर इतरांना 5-8 जागा मिळत आहेत.

रिपब्लिक इंडिया – मॅट्रिसच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 18-24, काँग्रेसला 55-62, जेजेपी आघाडीला 0-3, INLD आघाडीला 03-06 आणि इतरांना 2-5 जागा मिळण्याची शक्यता आहे.

हरियाणात भाजपला हॅटट्रिकची आशा आहे तर काँग्रेस सत्ताविरोधी दावा करून १० वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्याची वाट पाहत आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली. 2019 मध्ये मात्र 16 जागा वाढल्या होत्या आणि भाजपला सात जागांचे नुकसान सहन करावे लागले होते. भाजपला बहुमतासाठी सहा जागा कमी होत्या आणि त्यांनी जेजेपीसोबत सरकार स्थापन केले होते.