चंदीगड : केंद्र सरकरकडून कोरोना लसीच्या वितरणाबबत नियोजन सुरु असतानाच हरियाणा सरकारने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र पाठवलं आहे. या पत्रात हरियाणा सरकारने लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, सुरक्षा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच आमदार आणि खासदारांनादेखील कोरोनाची लस द्या, अशी विनंती केली आहे (Haryana Government demand give first corona vaccine to MP and MLA).
“आमदार आणि खासदार हे लोकप्रतिनिधी आहेत. ते सतत लोकांच्या संपर्कात असतात. ते अनेक लोकांना भेटतात. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात त्यांनादेखील कोरोनाची लस देण्यात यावी”, अशी भूमिका हरियाणा सरकारने पत्राद्वारे मांडली आहे (Haryana Government demand give first corona vaccine to MP and MLA).
हरियाणा राज्यात सध्या 10 खासदार आहेत. यापैकी 3 केंद्रीय मंत्री आहेत. त्याचबरोबर 90 आमदार आणि 5 राज्यसभेचे खासदार आहेत. दरम्यान, या पत्रात महापौर, ग्रामीण भागातील सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष अशा लोकप्रतिनिधींना पहिल्या टप्प्यात लस देण्याची विनंती करण्यात आलेली नाही.
केंद्र सरकारने कोरोना लसीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. भारतात लवकरच कोरोना लसीच्या लसीकरणाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती देण्यात आली होती. लसीकरण्याच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, अशा फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोना लस दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली होती. त्याचबरोबर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.
पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस
भारतात कोरोना लसीचा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 कोटी आरोग्य कर्मचारी, 2 कोटी पोलीस, आर्मी आणि सुरक्षा यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. तर 27 कोटी 50 वर्षावरील आणि 50 वर्षाखालील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लसीकरण्यासाठी प्रत्येक राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर टास्क फोर्स असणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
हेही वाचा : कोरोना, कर्करोगापेक्षाही कैकपट भयंकर ‘हे’ आजार, दरवर्षी घेतात तब्बल 90 लाख लोकांचा बळी!