प्रक्षोभक भाषण करण्याची मोठी शिक्षा, आजम खान यांना तीन वर्ष कारावास, आमदारकी धोक्यात

| Updated on: Oct 27, 2022 | 7:26 PM

रामपूरच्या विशेष एमपी-एमएलए कोर्टाने आजम खान यांना शिक्षा सुनावली आहे. दोन समुदायांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी चुकीची माहिती देणे, धार्मिक भावनांवरुन भडकावणं अशा आरोपांप्रकरणी कोर्टाने आजम खान यांना दोषी ठरवलं आहे.

प्रक्षोभक भाषण करण्याची मोठी शिक्षा, आजम खान यांना तीन वर्ष कारावास, आमदारकी धोक्यात
आजम खान
Follow us on

लखनऊ : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार आजम खान यांच्या अडचणीत वाढ करणारी बातमी समोर आली आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कोर्टाने त्यांना तीन वर्ष कारावासाची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. आजम खान यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका मानला जातोय. कारण कोर्टाच्या या निर्णयाने त्यांची आमदारकीदेखील धोक्यात आली आहे. कारण नियमानुसार आमदार-खासदाराला दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा सुनावल्यास त्याची आमदारकी आणि खासदारकी रद्द होते. कोर्टाने कलम 125, 505 आणि 153 (अ)च्या अंतर्गत आजम खान यांना शिक्षा सुनावली आहे. आजम खान यांचे वकील विनोद यादव यांनी कोर्टात सुनावणी संपल्यानंतर महत्त्वाची माहिती दिली. आजम खान यांना अर्ज दाखल करण्यासाठी कोर्टाने त्यांना सात दिवसांचा कालावधी दिला असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

रामपूरच्या विशेष एमपी-एमएलए कोर्टाने आजम खान यांना शिक्षा सुनावली आहे. दोन समुदायांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी चुकीची माहिती देणे, धार्मिक भावनांवरुन भडकावणं अशा आरोपांप्रकरणी कोर्टाने आजम खान यांना दोषी ठरवलं आहे. कोर्टाने त्यांना कलम 125, 505 आणि 153 (अ)च्या अंतर्गत दोषी ठरवत तीन वर्ष कारावासाची आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर काही कालावधीनंतर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. त्यामुळे त्यांना जेलमध्ये जाण्यापासून तात्पुरता सुटका मिळाली. पण त्यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा आहे.

खरंतर संबंधित प्रकरण हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे. आजम खान यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या त्या विधानावरुन राजकीय वातावरण प्रचंड तापलं होतं. अखेर याप्रकरणी मिलक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित घटनेप्रकरणी रामपूरच्या विशेष एमपी-एमएलए कोर्टात सुनावणी सुरु होती.

हे सुद्धा वाचा

आजम खान यांनी तत्कालीन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. या प्रकरणी भाजप नेते आकाश सक्सेना यांनी पोलिसात तक्रार केली होती. या प्रकरणी दोन्ही पक्षाकडून गेल्या अनेक महिन्यांपासून कोर्टात युक्तीवाद सुरु होता. अखेर कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत गेल्या सुनावणीवेळी निकाल राखून ठेवला होता. तसेच 27 ऑक्टोबरला याबाबत निकाल जाहीर करण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार कोर्टाने आज निकाल जाहीर करत आजम खान यांना दोषी ठरवलं.