“मी चेंगराचेंगरी होण्यापूर्वी…”, 121 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भोलेबाबाकडून निवेदन जारी; म्हणाला “काही समाजकंटक…”

| Updated on: Jul 04, 2024 | 8:22 AM

हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आता भोलेबाबा उर्फ नारायण सरकार हरि यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत निवेदन जारी केले आहे.

मी चेंगराचेंगरी होण्यापूर्वी..., 121 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भोलेबाबाकडून निवेदन जारी; म्हणाला काही समाजकंटक…
Follow us on

Hathras Stampede Bhole Baba First Reaction : उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या भोलेबाबांच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमुळे तब्बल 121 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी भोले बाबाचा मुख्य सेवादार आणि आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेश हादरले आहे. त्यातच आता या संपूर्ण प्रकरणावर भोलेबाबा उर्फ नारायण सरकार हरि याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

भोलेबाबाची पहिली प्रतिक्रिया

हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आता भोलेबाबा उर्फ नारायण सरकार हरि यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत निवेदन जारी केले आहे. मी चेंगराचेंगरी होण्यापूर्वी तिथून निघून गेलो होतो. या चेंगराचेंगरीत ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच या घटनेत जे कोणी जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. या प्रकरणी मी वरिष्ठ वकील डॉ.ए.पी. सिंह यांना कारवाई करण्याची विनंती केली आहे. कारण काही समाजकंटकांमुळे ही चेंगराचेंगरी झाली, असे भोलेबाबाने त्याच्या निवेदनात म्हटले आहे.

 

हे सुद्धा वाचा

हाथरस दुर्घटना

नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील फुलरई गावात मंगळवारी 2 जुलैला सत्संग आयोजित करण्यात आला होता. स्थानिक धर्मोपदेशक नारायण साकार विश्व हरी उर्फ ​​भोले बाबा नावाच्या अध्यात्मिक गुरुने हा संत्सग आयोजित केला होता. त्याच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले होते. भोले बाबांनी सत्संग स्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्यासाठी गर्दी जमली. त्यासाठी लोक जमिनीवर पसरले होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत भाविक जवळच्या नाल्यात पडले. या चेंगराचेंगरीत 121 भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. जे लोक जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

FIR मध्ये दिलेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरी झाली त्याआधीच भोलेबाबा निघत होते. दुपारी दोन वाजता हाथरस येथील सत्संगाच्या ठिकाणी भोलेबाबांच्या अनुयायांची मोठी गर्दी झाली. FIR मध्ये हेदेखील नमूद करण्यात आलं आहे की लोक नाल्यात पडले आणि त्यानंतर चेंगराचेंगरी वाढली. या घटनेनंतर पोलिसांनी भोले बाबाचा मुख्य सेवादार आणि आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण या एफआयआरमध्ये भोले बाबाचे नाव नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.