शिमला: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मजमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीचा पहिला कल समोर आला असून त्यात ‘कांटे की टक्कर’ पहायला मिळतेय. काँग्रेसने यावेळी स्थानिक समस्यांना महत्त्वाचा मुद्दा बनवून निवडणूक लढवण्याच्या रणनितीवर काम केलं होतं. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने (भाजप) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या नावांवर जोर देत पुन्हा सरकार आणण्याची घोषणा दिली. पहिला कल पाहता भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पहायला मिळतेय.
विधानसभा निवडणुकीचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होतील. जर भाजप सरकार स्थापन करण्यात यशस्वी होत असेल तर 1985 नंतर हे पहिल्यांदा असं घडणार आहे. कारण हिमाचलमध्ये 1985 नंतर कोणत्याच राजकीय पक्षाला निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळालेला नाही. दुसरीकडे काँग्रेसकडून सत्ता पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचं सरकार येणार की नाही, याचं चित्र आज स्पष्ट होईल. मात्र 37 वर्षांचा हा विक्रम मोडण्यासाठी भाजपसमोर ‘ओल्ड पेन्शन स्कीम’ आणि 21 बंडखोर उमेदवारांना मैदानात उतरवल्याचं आव्हान आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान 12 पैकी 8 जिल्ह्यांमध्ये हिमाचलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आणि अनेक मंत्र्यांचे दौरे यांचा सकारात्मक परिणाम भाजपसाठी होऊ शकतो. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांने केलेल्या दाव्यांचं सत्यही आजच्या निकालातून स्पष्ट होईल.
मतमोजणीचा सुरुवातीचा कल पाहता हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडीवर दिसतेय. मात्र जागांमध्ये फारसं अंतर नाही. जुनी पेन्शन स्कीम आणि भाजपच्या बंडखोर नेत्यांमुळे भाजपला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अधिक नुकसान होणार असल्याचं म्हटलं जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीचा सामना असून काँग्रेस सत्तांतर घडवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.