केंद्रात नरेंद्र मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येताच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. मागच्या महिन्यात रियासी येथे यात्रेकरुंच्या बसवर हल्ला झाला होता. जम्मूमध्ये हा हल्ला झालेला. या हल्ल्यात 9 यात्रेकरुंचा मृत्यू झाला. 33 जण जखमी झाले. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी सोमवारी कठुआ येथे दहशतवाद्यांनी घात लावून भारतीय सैन्य ताफ्यावर हल्ला केला. यात पाच जवान शहीद झाले. अन्य 5 जवान जखमी झाले. डोंगरावर असताना सैन्याच्या ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. त्यानंतर हाय टेक मशीन गनने सतत फायरिंग केली. या वाढत्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी काश्मीर वर आर्थिक बहिष्कार टाकण्याची मागणी केलीय.
‘काश्मीर सहली बंद करा, काश्मीर वर आर्थिक बहिष्कार टाका’ अशी मागणी हिंदू महासंघाने केलीय. “काश्मीरच नव्हे, तर जम्मूमध्ये सुद्धा अतिरेकी हल्ले वाढले आहेत. मागील 3 महिन्यात 20 हल्ले आणि 70 हिंदुंच्या हत्या झालेल्या आहेत. त्यात सैनिक सुद्धा ठरवून मारले जात आहेत” असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. “हे अतिरेकी हल्ले करणारे कोण आहेत? कोठे लपलेत? हे सर्व स्थानिकांना माहित असते पण तेथील स्थानिक या बाबत गप्प राहतात” असा दावा आनंद दवे यांनी केला.
‘यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या तरच हे गप्प राहतील’
“काश्मीरमधील मुस्लिमांना हिंदू नकोच आहेत. तुम्ही या, फिरा आम्हाला पैसे द्या आणि परत जा एवढ्यासाठीच त्यांना हिंदू हवे आहेत. हिंदुंच्याच पैशावर तेथील अर्थकारण आणि स्पष्ट सांगायचं तर जिहाद पोसला जात आहे आणि वर केंद्र परत कोटींची भिख त्यांना देत आहे. यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या तरच हे गप्प राहतील” हे वक्तव्य आनंद दवे यांनी केलं. “आम्ही महाराष्ट्रामधील सर्व टुरिस्ट कंपन्या, गाईड यांना आपण काश्मीर सहली रद्द कराव्यात असं पत्र पाठवत असून लोकांना सुद्धा काश्मीरला न जाण्याची विनंती करत आहोत” असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. “आपल्याच पैशाने आपल्यावरच हल्ला होण्यासाठी शस्त्रे घेतली जाणार नाही, याची काळजी आत्ता हिंदूंनींच घेणं आवश्यक आहे” असं आनंद दवे म्हणाले.