अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. दोन दिवसांचा त्याचा हा दौरा आहे. त्यानिमित्त अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रभू रामचंद्राची आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर शरयू नदी किनारी महाआरती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री जिथे जिथे जातील तिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच लखनऊ विमानतळापासून ते अयोध्येपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज आणि कटआऊट्स लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा असला तरी अयोध्येतील एका बॅनर्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ते म्हणजे नवनीत राणा यांच्या बॅनर्सने. नवनीत राणा यांचं बॅनर्स अयोध्येत लागलं असून त्यावर हिंदू शेरनी असं लिहून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
अयोध्येच्या शरयू घाटावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे बॅनर आणि पोस्टरही लावण्यात आले आहेत. कालपर्यंत अयोध्येच्या रस्त्यावर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर दिसत होते. मात्र आज अयोध्येच्या रस्त्यांवर खासदार नवनीत राणा यांचे मोठे होर्डिंग्ज आणि बॅनरही दिसत आहेत. या पोस्टर्स आणि बॅनर्सवर हिंदू शेरनी असं लिहिलं आहे. ‘जो प्रभु श्री राम का नहीं, श्री हनुमान का नहीं, वह किसी काम का नहीं’ असंही पोस्टर्स आणि बॅनर्सवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे हे बॅनर्स, पोस्टर्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
नवनीत राणा यांच्या पोस्टर्समधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाना साधण्यात आला आहे. हनुमान चालिसाचा पठन केलं म्हणून नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोघांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या दोघांना 14 दिवसांची कोठडीही झाली होती. त्यामुळेच नवनीत राणा यांच्या समर्थकांनी शिंदे यांच्या दौऱ्याचं निमित्त साधून उद्धव ठाकरे यांच्यावर पोस्टरमधून निशाना साधला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोधा शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलीसांच्या चेकपोस्ट आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आज सकाळी अयोध्येतील सुरक्षेचा आढावा घेतला. श्री राम मंदिर बांधकाम परिसर, श्री राम दर्शन, शरयू नदीचा परिसर, हनुमान गढी मंदिर… या ठिकाणी एकनाथ शिंदे भेट देणार आहेत. त्यामुळे या परिसरात आज सकाळपासून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसेच या परिसरात बॅरिकेटिंग करण्यात आली आहे.
दरम्यान, अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक लखनऊ विमानतळावर यायला सुरुवात झाली आहे. एकट्या ठाण्यातूनच दोन हजार शिवसैनिक अयोध्येला येणार आहेत. शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच शिवसैनिकांसाठी अयोध्येत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्येतील सर्व हॉटेल बुक झाल्या आहेत. त्यामुळे शिवसैनिकांची शहराच्या इतर भागात राहण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचं समजतं.