Ayodhya Ram mandir : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण देशात उत्सहाचे वातावरण आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली आहे. पहिल्यात दिवशी लाखो लोकांनी दर्शन घेतले आहे. अजूनही लाखो लोकं दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. राम मंदिराच्या उभारणीनंतर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर आनंद व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची ‘प्राणप्रतिष्ठा’ करून उल्लेखनीय कार्य केले आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून श्री रामांचे भक्त या क्षणाच्या प्रतिक्षेत होते. प्रभू रामाला मंडपातून भव्य मंदिरात कधी नेणार असा प्रश्न ते विचारत होते. बाबराच्या काळात आपल्या हृदयात झालेली खोल जखम आता पुसून टाकली आहे.
औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर उद्ध्वस्त केल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे. मोदींनीच इतक्या वर्षांनी त्याचे नूतनीकरण करून तेथे कॉरिडॉर बांधला. बाबरने अयोध्येतील राम मंदिर उद्ध्वस्त केले होते. आता तिथे राम मंदिर बांधले गेले आहे आणि पंतप्रधानांनी तिथे प्राणप्रतिष्ठा केली आहे. 2014 पूर्वीची सरकारे देशाची संस्कृती, धर्म आणि भाषा यांचा आदर करण्यास घाबरत असल्याचा आरोप देखील अमित शहा यांनी केला आहे.
राम मंदिर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत आहेत. कारण रामाला मानणारे भक्त देशातच नाही तर जगभरात आहेत. ब्रोकरेज फर्म जेफरीजने आपल्या एका अहवालात अंदाज व्यक्त केला आहे की अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य उद्घाटनामुळे दरवर्षी किमान पाच कोटी पर्यटक शहरात येण्याची शक्यता आहे.
२२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पहाटेपासून लोकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. काल ५ लाखाहून अधिक लोकांनी श्री रामांचे दर्शन घेतले आहे. याआधीच ही शक्यता वर्तवण्यात आली होती. पण अंदाजापेक्षा जास्त रामभक्त अयोध्येत दाखल होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल अयोध्येत पाहणी देखील केली होती.