नवी दिल्ली – लडाखच्या तुर्तक भागात सैन्यदलाची गाडी श्योक नदीत सुमारे ५० ते ६० फूट नदीत कोसळली. यात ७ जवान शहीद आणि काही जवान जखमी झाले आहेत. इंयिन आर्मीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे, २६ जवानांची एक तुकडी परतापूरच्या हनीफ सेक्टरवरुन फॉरवर्ड पोस्टला जात होती. लडाखमध्ये सैनिकांचे जगणे हे अत्यंत अवघड आहे. या ठिकाणी अत्यंत उंचावर असलेली ठाणी आणि या ठिकाणी असलेले तापमान यामुळे इथला संघर्ष हा नेहमीच जीवघेणा असतो. नेमके इथे सैनिक कसे जीवन जगतात, हे टीव्ही ९ने जाणून घेतले आहे, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याकडून
या ठिकाणी जे सैनिक राहतात, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सियाचिन ग्लेशर ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे. या ठिकाणी १६ ते १७ हजार उंचावर सैन्याची ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी जाण्यासाठी सुमारे २२ दिवस वातावरणाशी समरस होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यातही तिथे गेल्यावर उंचावर विरळ होणाऱ्या ऑक्सिजनमुळे तिथे काम करणे अत्यंत अवघड असते. गेलेल्या व्यक्तीही त्या ठिकाणी राहू शकत नाहीत, त्यातील ५ ते १० टक्क्यांची पाठवणी केली जाते. साधे सुट्टीवर जायचं असेल तरी सहाते सात दिवस लागतात. आधी लेहला यावं लागतं. मग कारगील, श्रीनगर, जम्मू असा प्रवास करत ट्रेनमध्ये बसून गावी यावे लागते.
गाडी ज्या रस्त्यावरुन जात होती, त्या ठिकाणी ड्रायव्हरचा अंदाज चुकला असण्याची शक्यता आहे. लेह लडाखमध्ये रस्ते अत्यंत डोंगराळ आहेत. या रस्त्यात गाडी चालवताना छोटी चूक झाली तरी त्याचे परिणाम भयंकर असू शकतात. या ठिकाणचे हवामान थंड असते. सध्या मे महिना सुरु आहे. मे महिन्यातही रात्री तापमान शून्याखाली येते. त्यामुळे शरिराच्या प्रक्रियाही संथावतात. कदाचित अपघातावेळी ड्रायव्हरची प्रतिक्रिया संथावली असल्यानेही हा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा अपघात सकाळी ९च्या सुमारास झाला. त्यावेळी तिथे दोन, चार डिग्री तापमान असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी उंचावर असल्याने हवा वेगाने वाहते, सतत बर्फ पडलेला असतो. सगळ्या या जवानांच्या फलटणी असतात, त्या अशा स्थितीत त्या ठिकाणी कार्यरत असतात.
लडाख हा भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी भारत चीन आणि भारत पाकिस्तान या दोन्हींच्या सीमा याच भागात आहेत. चीन आणि पाकिस्तानशी असलेला संघर्ष हा १६-१७ हजार फूट उंचीवरचा आहे. साधारणपणे पाकिस्तानला जोडून अर्धी आणि चीनला जोडून अर्धी सीमा या भागात आहे. पूर्व लडाखच्या भागात अक्साई चीन हा भूभाग येतो. गल्वान परिसरात दोन वर्षांपूर्वी झालेल्या संघर्षात चीनचे ६० ते ७० सैनिक मारले गेले होते, तर भारतीय सैन्याचेही नुकसान झाले होते. याच भागात कारगिल युद्ध आणि गल्वानची चकमक झाली होती. ऑक्सिजन कमी असताना त्या परिसरात सक्रिय राहणे आणि संघर्ष करणे हे मोठे आव्हान आहे.