नवी दिल्ली: श्रद्धा हत्याकांडातील आरोप आफताब अमीन पूनावालाची पॉलिग्राफ अर्थात लाय डिटेक्टर टेस्ट होणार आहे. या पॉलिग्राफ टेस्टला कोर्टात फार महत्त्व नसतं. पण या टेस्ट दरम्यान अट्टल गुन्हेगारही पोपटा सारखा बोलतो. सर्व माहिती देतो. त्यामुळे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना पुरावे शोधणं सोप्प जातं आणि गुन्ह्याची उकल होण्यास मदत होते. त्यामुळे ही मशीन नक्की कसे काम करते यावर टाकलेला हा प्रकाश.
एखादा व्यक्ती असत्य बोलतोय हे या मशीनमधून समजतं. 101 वर्षापूर्वी जॉन अगस्तस लार्सन यांनी ही मशीन बनवली होती. या मशीनद्वारे गुन्हेगारांकडून सत्य वदवून घेणं हा या मशीनचा हेतू होता. आपल्या देशात पॉलिग्राफ टेस्ट, नार्को टेस्ट करण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. प्रकरणाचं गांभीर्य पाहून कोर्टही अशा प्रकारच्या टेस्टला परवानगी देते.
उत्तर देताना एखादी व्यक्ती खोटं बोलतेय की खरं हे पॉलिग्राफ टेस्टमधून दिसतं. जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलते तेव्हा त्या व्यक्तीचा हार्ट रेट, ब्लड प्रेशर बदलतो. त्याला घाम येतो. डोळे गरगर फिरू लागतात.
अनेकदा पॉलिग्राफ टेस्टच्यावेळी हातापायाच्या हालचालींवरही लक्ष दिलं पाहिजे. साधारणपणे या टेस्ट दरम्यान चार गोष्टी दिसून येतात.
ब्रिदिंग रेट
नाडीची गती
रक्तदाब
घाम किती येतो
पॉलिग्राफ टेस्टवेळी मशीनचे चार किंवा सहा प्वॉइंट्स व्यक्तीच्या छाती, बोटांना जोडली जातात. त्यानंतर काही साधारण प्रश्न विचारले जातात. त्यानंतर गुन्ह्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात. त्यावेळी मशीनच्या स्क्रीनवर त्या व्यक्तीची हार्टरेट, ब्लड प्रेशर, नाडीची गती आदीवर लक्ष ठेवलं जातं.
टेस्ट करण्यापूर्वी मेडिकल टेस्ट केली जाते. त्यावेळची हार्ट रेट, रक्तदाब आणि नाडीची गती या गोष्टी नोट केल्या जातात. जेव्हा टेस्ट सुरू होते. तेव्हा व्यक्ती खोटं बोलत असेल तर हार्ट रेट, रक्तदाब आणि नाडीची गती वाढते. डोक्याला आणि हाताला घाम येतो. त्यावरून संबंधित व्यक्ती खोटं बोलत असल्याचं दिसून येतं.
प्रत्येक प्रश्नावेळी हे सिग्नल रेकॉर्ड केले जातात. जर व्यक्ती खरं बोलत असेल तर त्याच्या सर्व गोष्टी सामान्य असतात. तसेच खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूतूनही सिग्नल मिळतात. त्यामुळेच हार्ट रेट आणि रक्तदाब वाढतो.