IAS Sanjeev Hans: काही दिवसांपूर्वी आएएस अधिकारी संजीव हंस चर्चेत आले होते. त्यांची चर्चा त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे झाली नाही. त्यांनी केलेल्या जोरदार कमाईमुळे ते चर्चेत आले. त्यांनी इतकी कमाई केली की ईडीलासुद्धा कामाला लागावे लागले. त्यानंतर त्यांना अटक झाली. केंद्र सरकाराने त्यांना सेवेतून निलंबित केले आहे.
आयएएस अधिकारी संजीव हंस हे बिहार कॅडरचे अधिकारी आहेत. पंजाबमध्ये 19 ऑक्टोंबर 1973 रोजी त्यांचा जन्म झाला. घरात शैक्षणिक वातावरण असल्यामुळे त्यांनी बारावीनंतर अभियांत्रिकीची पदवी घेतली. सिव्हील इंजीनियरिंगमधून बीटेक केले. त्यानंतर यूपीएससीची तयारी सुरु केली. 1997 मध्ये ते आयएएस झाले. मसरी प्रशासनिक ट्रेनिंगनंतर त्यांना बिहार केडर मिळाले. बिहारमध्ये त्यांनी अनेक पदांवर काम केले.
आयएएस बनल्यानंतर त्यांची पहिली पोस्टींग बिहारमधील बांका जिल्ह्यात झाली. अनेक जिल्ह्याचे ते जिल्हाधिकारी राहिले. आयएएस संजीव हंस ऊर्जा विभागात प्रधान सचिव आणि बिहार स्टेट पॉवर होल्डिंग कंपनीचे एमडीसुद्धा झाले. त्यावेळी त्यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यात प्रीपेड मीटर लावण्यासाठी कंपनीत लाच घेतली आणि हेराफेरी केल्याचा आरोप आहे.
आयएएस संजीव हंसवर भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झाले. त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. ईडीने संजीवर हंस आणि गुलाब यादव यांच्यासह पाच जणांवर 100 कोटी रुपयांचा गोलमाल केल्याचा आरोप केला आहे. 20 हजार पानांचे चार्जशीट ईडीने तयार केले आहे. आयएएस अधिकारी संजीव हंस यांना केंद्र सरकारने निलंबित केले आहे. ईडीच्या कारवाईनंतर केंद्राने निलंबनाची कारवाई केली. त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवला होता.
मीडिया रिपोर्टनुसार संजीव हंस यांनी चंदीगडमध्ये 95 कोटी रुपयांचे रिसॉर्ट घेतले. प्रीपेड मीटर सक्तीचे केल्यानंतर बिहारमध्ये त्याची मागणी प्रचंड वाढली. त्यामुळे प्रीपेड मीटर बनवणाऱ्या कंपन्यांनी त्यांना दोन मर्सिडीज कार गिफ्ट दिल्या. पुणे, गोवा, चंदीगडमधील त्यांची संपत्ती पाहून ईडीला धक्का बसला. संजीव हंसच नव्हे तर त्यांच्या जवळचे लोक आणि नातेवाईकांनाही त्यांना चांगला धनलाभ करुन दिला आहे.