देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. ही निवडणूक जगातील सर्वात महाग निवडणूक ठरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत हजारो कोटी रुपये खर्च येत आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर झालेल्या देशातील पहिल्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने दहा कोटी रुपये खर्च केले होते. आता त्यात मोठी वाढ झाली आहे. सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या अंदाजानुसार लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत 1.20 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. हा अंदाज बरोबर असल्यास ही जगातील सर्वात महाग निवडणूक ठरणार आहे.
दर पाच वर्षांनी निवडणूक खर्च दुप्पट होत आहे. यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण सर्व 60 हजार कोटी रुपये खर्च झाला होता. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत 30 हजार कोटी रुपये खर्च झाला होता. लोकसभा निवडणुकीचा सर्व खर्च केंद्र सरकारच्या खात्यातून होतो. विधानसभा निवडणुकीचा खर्च राज्य सरकारकडून केला जातो. दोन्ही निवडणुका बरोबर झाल्यास राज्य आणि केंद्र यांच्यात खर्चाची विभागणी केली जाते.
2024 मधील लोकसभा निवडणुकीत 1.20 लाख कोटी रुपये खर्च होणार आहे. यामधील 20% खर्च निवडणूक आयोग करणार आहे. इतर खर्च राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांचा असणार आहे. या खर्चात सरकारला 80 कोटी लोकांना आठ महिने मोफत राशन वाटता आले असते. केंद्र सरकारकडून सध्या गरीबांना मोफत धान्य वितरण केले जाते. त्याचा तीन महिन्यांचा खर्च 46 हजार कोटी रुपये आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी 1,500 कोटी रुपये प्रसिद्धीवर खर्च केले होते. त्यात सात राष्ट्रीय पक्षांचा खर्च 1,223 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रसिद्धीवर सर्वाधिक खर्च भाजप आणि काँग्रेसने केला आहे. भाजपने 650 कोटी तर काँग्रेसने 476 कोटी खर्च केला आहे.