क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरियोग्राफर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. गेल्या आठवड्यात फॅमिली कोर्टात हजर राहत त्यांनी पती – पत्नीचं नातं संपवलं आहे. घटस्फोटानंतर चहल याला धनश्रीला पोटगी स्वरूपात 4 कोटी 75 लाख रुपये द्यावे लागले आहेत. रिपोर्टनुसार, चहलने पूर्व पत्नीला 2 कोटी 37 लाख आणि 55 हजार रुपये दिले आहे. अता उर्वरीत रक्कम क्रिकेटर लवकरच धनश्रीला देईल… असं देखील सांगण्यात येत आहे.
सांगायचं झालं तर देशात असे अनेक घटस्फोट झालेत, ज्यामध्ये पतीला घटस्फोटाच्या बदल्यात पत्नीला मोठी रक्कम द्यावी लागली आहे. अशात पुरुषांना देखील घटस्फोटानंतर पोटगी मिळू शकते का? असा प्रश्न उपस्थित होतो. तर पुरुषांना देखील घटस्फोटानंतर पोटगी मिळू शकते. पण त्यासाठी देखील काही अटी आहेत.
सुप्रीम कोर्टाचे वकील आशिष पांडे म्हणतात, ‘भारतीय कायद्यात पोटगीची रक्कम देण्याचा कोणतं ठरलेलं समिकरण नाही. पोटगी रक्कम ठरवताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. ज्यावर ठराविक रक्कम ठरवली जाते. पोटगीची रक्कम ठरवण्यासाठी पती – पत्नीची आर्थिक परिस्थिती, त्यांचं उत्पन्न, खर्च.. अनेक बाबींचा विचार केला जातो…’
जर कोणाती महिला 10 वर्षांपासून गृहिणी आहे आणि महिलेला पतीकडून घटस्फोट हवा असेल तर कोर्ट पोटगीची रक्कम ठरवताना पतीच्या उत्पन्नाचा विचार करेल, कारण महिला फक्त गृहिणी आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी तिच्याकडे पैसे नाहीत, जिने संसारासाठी स्वतःच्या करियरचा त्याग केला… अशात महिलेचा आणि मुलांचा खर्च लक्षात घेत पोटगीची रक्कम ठरवली जाते…
पती-पत्नी दोघेही दरमहा 50 – 50 हजार रुपये कमावत आहेत. त्यामुळे दोघांची आर्थिक स्थिती सारखीच असल्याने न्यायालयाने पोटगीचे आदेश दिलेच पाहिजेत असं नाही. जर पत्नी किंवा पती दोघांवर मुलांचा सांभाळ करण्याचा आर्थिक भार असेल तर न्यायालय आर्थिक मदतीचे आदेश देऊ शकते. हे ठरवताना दोघांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती काय आहे, पत्नी आणि आश्रित मुलांच्या गरजा काय आहेत, दोघेही नोकरी करतात का, हे पाहिलं जातं. त्यांची पात्रता काय आहे हे ध्यानात ठेवलं जातं.
सुप्रीम कोर्टाने आधीच सांगितलं आहे की, पोटगी म्हणजे आश्रित जोडीदाराला मदत करणे आहे. दुसऱ्या पक्षाला शिक्षा करणे नाही. अशात पुरुषांना देखील पोटगीची रक्कम मिळू शकते. पण त्यासाठी देखील काही अटी आहेत.
भारतीय न्यायव्यवस्थेत पुरुषांना देखील पोटगी मागण्याचा अधिकार आहे. पती हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 24 आणि 25 अंतर्गत भरणपोषणाची मागणी करू शकतो. पतीला केवळ विशिष्ट परिस्थितीतच पोटगी मिळू शकते.
यासाठी पतीला हे सिद्ध करावे लागेल की तो काही विशेष कारणास्तव पत्नीवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून होता. उदाहरणार्थ, तो अपंगत्वाने ग्रस्त असेल किंवा इतर काही परिस्थितीमुळे तो कमवू शकत नसेल. अशा परिस्थितीती पुरुषांना पोटगीची रक्कम मिळू शकते.