India-china Border Clash: LAC वर दादागिरी करणाऱ्या चीनला इंडियन एअर फोर्सच्या Su-30 जेट्सनी दाखवला ट्रेलर

| Updated on: Dec 13, 2022 | 1:36 PM

चीनला समजेल अशा भाषेत उत्तर देण्यासाठी इंडियन एअर फोर्स सज्ज

India-china Border Clash: LAC वर दादागिरी करणाऱ्या चीनला इंडियन एअर फोर्सच्या Su-30 जेट्सनी दाखवला ट्रेलर
indian air force
Image Credit source: instagram
Follow us on

नवी दिल्ली: नियंत्रण रेषेजवळ पुन्हा एकदा चीनने कुरापती सुरु केल्या आहेत. 9 डिसेंबरला अरुणाचल प्रदेशमधील तवांगच्या यांगत्से भागात भारतीय सैन्याने चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला चोख प्रत्युत्तर दिलं. LAC वर जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या 300 चिनी सैनिकांना भारतीय सैन्याने पळवून लावलं. या घटनेच्या आधी अरुणाचलमध्येच LAC जवळच्या भारतीय पोस्टवर चिनी ड्रोन्सनी चाल करुन येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या भागात तैनात असलेल्या इंडियन एअर फोर्सच्या फायटर जेट्सनी त्यांची योजना धुळीस मिळवली.

त्यांना त्याच भाषेत उत्तर मिळेल

“LAC वरील भारतीय पोस्टच्या दिशेने येणाऱ्या चिनी ड्रोन्सचा सामना करण्यासाठी इंडियन एअर फोर्सच्या फायटर जेट्सनी उड्डाण केलं. मागच्या काही आठवड्यात अशा घटना दोन ते तीन वेळा घडल्या आहेत. चीनने हवाई हद्दीच उल्लंघन केल्यास, त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी सुखोई-30 फायटर जेट्सनी उड्डाण केलं” संरक्षण दलातील सूत्रांनी एएनआयला ही माहिती दिली.

इंडियन एअर फोर्सच अत्यंत बारीक लक्ष

ईशान्येकडे चीनला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर चीनच्या ड्रोन हालचालींवर इंडियन एअर फोर्सच अत्यंत बारीक लक्ष आहे. ड्रोन किंवा चीनच्या कुठल्याही विमानाला हवाई हद्दीच उल्लंघन करु देणार नाही, असं सूत्रांनी सांगितलं.

सुखोई-30 चे स्क्वाड्रन्स तैनात

चिनी ड्रोन्स एलएसीच्या समांतर उड्डाण करत असतील, तर काही अडचण नाही. पण ही ड्रोन्स भारतीय हद्दीच्या दिशेने येताना, दिसली तर मात्र आवश्यक कारवाई केली जाईल, असं संरक्षण दलातील सूत्रांनी स्पष्ट केलं. आसामच्या तेजपूर, चाबुआ येथे इंडियन एअर फोर्सची मोठी उपस्थिती आहे. तिथे त्यांनी सुखोई-30 चे स्क्वाड्रन्स तैनात केले आहेत.