बाडमेर जिल्ह्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या IAS टीना डाबी ॲक्शन अंदाजात दिसल्या. बुधवारी बाडमेर जिल्हा कलेक्टर टीना या शहरातील रस्त्यांवर येऊन स्वच्छतेविषयी रोखठोक भूमिका घेताना दिसल्या. तर गुरुवारी त्यांनी जिल्ह्यातील डॉक्टरांची चांगलीच शाळा घेतली. त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या अशा डॉक्टरांच्या घरावर छापा मारला, जे ड्युटीच्या वेळेत सरकारी रुग्णालयात काम न करता आपल्या घरी रुग्णांवर उपचार करत होते. गुरुवारी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी अधिकाऱ्यांची तीन वेगवेगळी पथकं तयार करून सरकारी डॉक्टरांच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्यांनी ड्युटीच्या वेळात खाजगी दवाखान्यात रुग्णांवर उपचार कऱणाऱ्या दोन सरकारी डॉक्टरांना रंगेहाथ पकडलं. टीना यांच्याविषयीची खबर मिळताच काही डॉक्टर त्यांचा खाजगी दवाखाना सोडून पळून गेल्याचंही समजतंय.
जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी छापेमारीच्या कारवाईचा एक भाग म्हणून शहरातील नेहरू नगर इथल्या एका खाजगी दवाखान्याला भेट दिली. त्याठिकाणी डॉक्टर रमेश कटारिया हे त्यांच्या दवाखान्यात रुग्णांवर उपचार करत होते. त्यांची ड्युटी बाडमेरच्या मेडिकल कॉलेजमध्ये असताना ते खासगी दवाखान्यात काम करत होते. तर दुसऱ्या टीमसह एसडीएम आणि डीएसओ हे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आवारात राहणारे बालरोगतज्ज्ञ महेंद्र चौधरी यांच्या घरी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर डॉ. महेंद्र चौधरी यांनी त्यांच्या निवासस्थानाचं क्लिनिकमध्ये रुपांतर केल्याचं दिसलं.
याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी टीना डाबी स्वत: घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर पीएमओला फोन करून डॉ. महेंद्र चौधरी यांनी सांगितलं की, “माझी ड्युटी तुरुंगात आहे आणि तिथून परतल्यानंतर मी इथे आलोय.” त्यानंतर टीना या थेट रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या होत्या. तिथे त्यांनी डॉक्टरांच्या हजेरीचं रजिस्टर जप्त केलं. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. रमेश कटारिया आणि डॉ. महेंद्र चौधरी यांच्याविरुद्ध चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात पीएमओ डॉ. बीएल मन्सूरिया यांची भूमिकाही संशयास्पद आढळली. कारण हजेरी नोंदवहीत अनेक कॉलम रिकामे आढळले होते. त्यामुळे उपस्थिती आणि अनुपस्थिती याबद्दल जाणून घेणं फार कठीण होतं.
“अनेक तक्रारींनंतर डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी तीन पथकं तयार करण्यात आली होती. त्यानंतर दोन डॉक्टरांना रंगेहाथ पकडलं होतं. जे ड्युटीवर असताना खाजगी दवाखाना चालवत होते. याप्रकरणी पीएमओला चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय डॉक्टरांच्या हजेरीच्या रजिस्टरमधील अनेक कॉलमही रिकामे होते. ज्यामध्ये अनेक डॉक्टरांची उपस्थितीही नोंदवण्यात आली नाही,” अशी माहिती टिना डाबी यांनी दिली.