यंदा भारतात कडाक्याची थंडी पडू शकते. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरममध्ये ला निना सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाळा ऑक्टोबरपर्यंत वाढू शकतो. यामुळे यंदा कडाक्याच्या थंडीमुळे देशाच्या अनेक भागांमध्ये लोकांना त्रास होऊ शकतो. यंदा प्रथम कडक उष्मा, त्यानंतर पावसाच कहर यामुळे नागरिक हैराण झाले असताना आता हिवाळ्याबाबतही असाच दावा केला जात आहे. IMD च्या मते, ला निना सप्टेंबरमध्ये सक्रिय होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे डिसेंबरच्या मध्यापासून जानेवारीपर्यंत यंदा कडाक्याची थंडी पडू शकते. ला निना मुळे सामान्यतः तापमानात घट होते. त्यामुळे हिवाळ्यातही जास्त पाऊस पडतो. त्यामुळे हिवाळा अधिक लांब आणि तीव्र होतो.
ला निनामध्ये पूर्वेकडील वारे समुद्राचे पाणी पश्चिमेकडे ढकलत असतात. त्यामुळे समुद्राचा पृष्ठभाग हा थंड होतो. IMD चा अंदाज आहे की, सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान ला निना सक्रिय होण्याची शक्यता 66 टक्के आहे. तर हिवाळ्यात त्याच्या टिकून राहण्याची शक्यता 75 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ला निना परिस्थितीमुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. यंदा भारतात 15 ऑक्टोबरला मान्सून संपणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटी दक्षिण भारतात येणाऱ्या ईशान्य मान्सूनवरही याचा परिणाम होऊ शकतो.
यंदा देशात मान्सूनने काही भागात कहर केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूर आलाय. ऑगस्टमध्ये अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाने हवामान तज्ज्ञांनाही हैराण केले होते. त्यामुळेच आता सप्टेंबरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, ऑक्टोबरच्या अखेरीसही पाऊस होऊ शकतो. ला निना अजून सुरू व्हायचे आहे, त्यामुळे परिस्थिती 1999 सारखी होत आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर 1999 मध्ये सलग दोन चक्रीवादळ ओडिशावर धडकले होते. सर्वात विनाशकारी ओडिशा सुपर चक्रीवादळ ठरला होता. या चक्रीवादळाने दहा हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला होता. मान्सूनबद्दल बोलायचे झाले तर १ जून ते १ सप्टेंबर दरम्यान आठ राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या कालावधीत देशभरात सात टक्के अधिक पाऊस झाला आहे. नागालँड आणि मणिपूरमध्ये सर्वात कमी पाऊस झाला आहे. येथे 28 टक्के कमी पाऊस झाला आहे. तर बिहार, पंजाब आणि चंदीगडमध्ये 25 टक्के कमी पाऊस झाला आहे. देशातील एक चतुर्थांश जिल्ह्यांमध्ये कमी किंवा फार कमी पाऊस झाला आहे.
एप्रिल 2024 आणि 1999 मध्ये प्रचंड उष्णता होती. एप्रिल 1999 हा 20 व्या शतकातील सर्वात उष्ण एप्रिल होता. यामध्ये उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश भागात सुमारे पंधरा दिवस तापमान ४० अंश किंवा त्याहून अधिक राहिले. यंदा एप्रिलमध्ये दमट उष्णतेने विक्रम मोडले. त्याचप्रमाणे 1999 हे देखील ला निना वर्ष होते आणि त्यापूर्वी 1997-98 मध्ये एल निनो होता. ही परिस्थिती 2024 सारखीच आहे.
आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक म्हणाले की, यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला, पण जूनमध्ये कमी पाऊस झाला. जुलै आणि ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाला. मध्य पूर्व भागात कमी पाऊस पडत आहे आणि आता जास्त पाऊस पडू शकतो. त्याचे कारण म्हणजे ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. पूर्व गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात कोरड्या विसंगतींचे एक हॉट स्पॉट राहिले आहे. हे समजणे खूप कठीण आहे. उत्तरेकडील प्रदेश आणि हिमालयाच्या पायथ्याशीही 23 टक्के कमी पाऊस झाला आहे.