आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा लवकरच एक कायदा आणणार आहेत. त्यानुसार, आसाममध्ये जन्मलेलेच लोकच राज्यातील सरकारी नोकरीसाठी पात्र ठरतील. लवकरच एक नवीन डोमिसाइल पॉलिसी आणणार असल्याच सरमा म्हणाले. निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनानुसार, एक लाख सरकारी नोकऱ्यांमध्ये आसामच्या लोकांना प्राधान्य मिळालं आहे. सरकार स्थानिकांना प्राथमिकता देण्यासाठी कटिबद्ध आहे असं ते म्हणाले.
सीएम सरमा यांनी यावेळी काँग्रेसवर आरोपही केला. “काँग्रेसच्या कार्यकाळात पोलीस विभागात 30 टक्के नोकऱ्यांमध्ये एका विशेष समुदायाला नियुक्ती देण्यात आली. ज्यावेळी आम्ही 1 लाख लोकांना नोकऱ्या देऊ तेव्हा सर्व डेटा पब्लिश करु” असं सरमा म्हणाले. लोकांसाठी कल्याणकारी योजना बनवल्यामुळे भाजपा 2026 ला पुन्हा सत्तेत येईल, असा त्यांनी दावा केला.
लव जिहाद एक वास्तविक, गंभीर मुद्दा
राज्य सरकार लवकरच लव जिहादशी संबंधित प्रकरणात आजीवन कारावास कायदा आणण्याच्या तयारीत असल्याच हिंमत बिस्वा सरमा म्हणाले. प्रदेश भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले की, “निवडणुकीच्यावेळी आम्ही लव जिहादबद्दल बोललेलो. लवकरच आम्ही एक कायदा आणू. ज्यात अशा प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा असेल” लव जिहाद एक वास्तविक, गंभीर मुद्दा असल्याच ते म्हणाले. यात जबरदस्तीने धर्म परिवर्तन, फसवून प्रेमसंबंध येतात. यूपी विधानसभेने सुद्धा लव जिहादशी संबंधित प्रकरणात आजीवन कारवासाची शिक्षा निश्चित केली आहे.
जमिनीच्या खरेदी-विक्री संदर्भात काय निर्णय?
आसाम सरकार हिंदू-मुस्लिमांमधील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारासंदर्भात लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे, असं सीएम हिमंत म्हणाले. सरकारचा हा निर्णय रोखता येणार नाही. हिंदू-मुस्लिमांमध्ये जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणं अनिवार्य करण्यात येणार आहे.