कर्नाटक : पत्नी (Wife) घटस्फोट द्यायला तयार नव्हती म्हणून पती (Husband)ने सासरवाडीतील चौघांना पेटवून दिल्याची घटना कर्नाटकमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू (Death) झाला आहे तर दोघे जण 80 टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी नारायणपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरणप्पा असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेत आरोपीचा सासरा आणि मेहुणा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रायचूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये उपचार सुरु आहेत. शरणप्पा सररु (65), नागप्पा हागरगुंडा (35) अशी मयतांची नावे आहे. सिद्धरामप्पा मुरल (65) आणि मुत्तप्पा मुरल (40) अशी गंभीर भाजलेल्यांची नावे आहेत.
शरणप्पा आणि हुलीजेम्मा यांचा 16 वर्षापूर्वी विवाह झाला होता. या जोडप्याला दोन मुले आहेत. मात्र लग्नाच्या काही वर्षांनी दोघांमध्ये काही वाद झाला आणि दोघे वेगळे राहू लागले. हुलीजेम्मा आपल्या माहेरी राहत होती. हुलीजेम्मा लिंगसुगुर केएसआरटीसी डेपोमध्ये मेकॅनिक म्हणून काम करते. शरणप्पाला पत्नीकडून घटस्फोट हवा होता. मात्र पत्नी याला संमती देत नव्हती. बुधवारी शरणप्पाचे सासरे, मेहुणा आणि अन्य दोन नातेवाईक शरणप्पाकडे बोलणी करण्यासाठी आले होते. दोन्ही बाजूंनी बोलणी सुरु झाली. यावेळी त्यांनी काही अटींवर आक्षेप घेतला. यामुळे चिडलेल्या शरणप्पाने अचानक त्यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. यानंतर त्यांनी पळून जाऊ नये म्हणून घराला बाहेरून कुलूप लावले. सासरवाडीचे लोक येण्याआधीच शरणप्पाने घरात 5 लिटर पेट्रोल आणून ठेवले होते.
पेटवल्यानंतर चौघांनी आरडाओरडा केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी घराचे कुलूप तोडले. यानंतर नारायणपूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यादगीर जिल्ह्याचे एसपी सीबी वेदमूर्ती यांनी सांगितले की, आरोपीचे सासरे, मेहुणे आणि इतर दोन नातेवाईक गंभीर भाजले. चौघांना उपाचारासाठी रायचूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघा नातेवाईकांचा मृत्यू झाला. (In Karnataka the husband set fire to the four as his wife was not divorcing him)