भोपाळ : आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीवरुन मोठी खळबळ उडालीय. भाजपाने सोमवारी यादी जाहीर केली. मध्य प्रदेशातीलच अनेक भाजपा नेते या यादीमुळे हैराण झाले आहेत. काँग्रेसचे रणनितीकार सुद्धा या यादी मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भाजपा उमेदवारांची यादी शानदार असल्याच सांगितलं. भाजपाचा विजय रथ निघाला आहे, असं ते म्हणाले. आपलं पावणेचार वर्षाच कामकाज शानदार असल्याच शिवराज सिंह चौहान म्हणाले. यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांच्या टीमचे आभार मानले. “हे अद्भुत आणि अभूतपूर्व आहे. याने भारतीय जनता पार्टीचा महाविजय सुनिश्चित केला आहे. आमचे सर्व दिग्गज नेते निवडणूक लढतील. मुख्य समस्या काँग्रेसची आहे. त्यांना काही समजतच नाहीय. काय होतय हेच त्यांना कळत नाहीय. भाजपाच निरंतर विजयपथावर मार्गक्रमण सुरु आहे” असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं.
भाजपाने सोमवारी ज्या 39 उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यात 7 खासदारांमध्ये 3 केंद्रीय मंत्री आहेत. कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते, केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल, खासदार राकेश सिंह, खासदार गणेश सिंह, खासदार रीति पाठक हे विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. या यादीतील आठव नाव भाजपा सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचं आहे. हे अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे.
आधीपासूनच जे लोक खासदार किंवा केंद्रीय मंत्री आहेत, त्यांना भाजपाने का तिकीट दिलय? यामागे काय रणनिती आहे?
मुख्यमंत्रीपदाचा पर्याय खुला – जितके मोठे चेहरे या निवडणुकीत उतरलेत, त्यापैकी कोणीही मुख्यमंत्री बनू शकतो.
लोकप्रियतेची परीक्षा – नरेंद्र मोदींच्या नावावर लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्यांच्या लोकप्रियतेची टेस्ट आवश्यक आहे.
सत्ताविरोधी लाट – मागच्या 18 वर्षापासून भाजपा सत्तेवर आहे. त्यामुळे प्रस्थापित सरकारविरोधात एक लाट असते. मोठे चेहरे निवडणुकीत उतरवून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो.
सीट टू सीट मार्किंग- हरलेल्या जागांवर मोठ्या नेत्यांना लढवून विधानसभेची प्रत्येक जागा आमच्यासाठी महत्त्वाची आहे, हाच भाजपाला संदेश द्यायचा आहे.
एक कुटुंब एक उमेदवार – भाजपाने जालम सिंह पटेल यांचं तिकीट कापलं. त्यांच्या भावाला केंद्रीय मंत्री प्रह्लाद सिंह पटेलला विधानसभेची उमेदवारी दिली. म्हणजे एक कुटुंब एक उमेदवार हाच संदेश यातून द्यायचा असेल.
मध्य प्रदेशात भाजपा एका नव्या फॉर्म्युल्याने निवडणूक लढवतय हे स्पष्ट आहे. हे धक्कातंत्र आहे. आता हा फॉर्म्युला चालल्यास अन्य राज्यातही त्याची अमलबजावणी होऊ शकते. भाजपाने आतापर्यंत 78 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ज्या जागा गमावल्या होत्या, तिथूनच भाजपाने उमेदवारी जाहीर केलीय.