जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये सोमवारी सैन्यावर भ्याड हल्ला झाला. यात एकाचवेळी पाच जवान शहीद झाले. उत्तराखंड राज्यातून येणारे पाच जवान या हल्ल्यात शहीद झाले. घरातील वीर पुत्र देश सेवेत शहीद झाल्याचा संदेश मिळाल्यानंतर त्या कुटुंबांवर शोककळा पसरली. देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीर जवानांप्रती संपूर्ण उत्तराखंडमध्ये शोक व्यक्त केला जातोय. सोमवारी दुपारी कठुआ येथे सैन्याच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या शहीद जवानांमध्ये एक असही कुटुंब आहे, ज्या घरात मागच्या दोन महिन्यात दोन मुलं देशासाठी शहीद झाली आहेत.
आम्ही ज्या कुटुंबाबद्दल बोलतोय ते टिहरी जिल्ह्यात देव प्रयाग येथील कीर्तीनगरच्या थाती (डागर) गावचं आहे. रायफलमॅन आदर्श नेगी यांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांच बलिदान दिलं. आदर्श नेगी शहीद झाल्याची बातमी गावात पोहोचताच, संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं. फक्त शहीदाच कुटुंबच नाही, अख्ख गाव दु:खात बुडालं आहे. 26 वर्षाच्या आदर्शच लग्न झालं नव्हतं. इतक्या कमी वयात त्याने देशासाठी आपल्या प्राणांच बलिदान केलं.
कर्तव्य बजावताना अखेरचा श्वास
मागच्या दोन महिन्यान दुसऱ्यांदा आदर्श नेगीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. याआधी याच कुटुंबाने आपला एक मुलगा देशाला अर्पण केला. दोन महिन्यांपूर्वी आदर्श नेगीच्या काकाचा मुलगा देश सेवेच कर्तव्य बजावताना शहीद झाला. भारतीय सैन्यात मेजरच्या पोस्टवर असलेला प्रणय नेगी देश सेवेत असताना शहीद झाले. आता दुसरा मुलगा आदर्श नेगी शहीद झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 2018 साली आदर्श गढवाल रायफलमध्ये भरती झाला होता. 6 वर्ष देशाच्या सुरक्षेसाठी तैनात होता. अखेर कर्तव्य बजावताना अखेरचा श्वास घेतला.
आदर्श यांच्या पश्चात कुटुंबात कोण?
शहीद रायफलमॅन आदर्श नेगी यांच्या पश्चात त्यांचे वडील दलबीर सिंह नेगी, आई, एक भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. त्याचा भाऊ चेन्नई येथे नोकरीला आहे. मोठ्या बहिणीच लग्न झालय. वडील शेतकरी आहेत. आदर्श याचवर्षी गावी आला होता.
हाय टेक मशीन गनने सतत फायरिंग
सोमवारी जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे दहशतवाद्यांनी घात लावून भारतीय सैन्य ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. अन्य 5 जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पंजाब पठाणकोट येथील सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डोंगरावर असताना सैन्याच्या ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. त्यानंतर हाय टेक मशीन गनने सतत फायरिंग केली. जखमी जवानांना आधी कठुआ येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रात्री उशिरा त्यांना पठानकोटला पाठवण्यात आलं.