नवी दिल्ली | 7 डिसेंबर 2023 : आयकर विभागाकडून देशभरात अनेक ठिकाणी छापेसत्र सुरु असतात. परंतु ओडिशा आणि झारखंडमध्ये टाकलेले छापे वेगळेच ठरले. या छाप्यात मिळालेली रक्कम पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली. अधिकाऱ्यांना ट्रकमधून पैसे न्यावे लागले. अधिकारी, कर्मचारीच नाहीतर छाप्यातील रक्कम मोजता मोजता मशीनसुद्धा खराब झाले. आयकर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओडिशा आणि झारखंडमधील बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या छापेमारीत मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाली. ओडिशामधील बोलांगीर आणि संबलपूर तसेच झारखंडमधील रांची, लोहरदगामध्ये आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यात बुधवारी ५० कोटी रुपये मोजण्यात आले. त्यानंतर मशीनच खराब झाले. या छाप्यानंतर दोन व्यापारी फरार झाले.
बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (बीडीपीएल) ही कंपनी मद्य बनवणारी आहे. ही कंपनी रामचंद्र रूंगटा यांची आहे. बुधवारी या कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. गुरुवारी दुसऱ्या दिवशीही ही छापेमारी कायम होती. आयकर विभागाने ओडिशामधील कार्यालयात टाकलेल्या छाप्यात १५० कोटी रुपये जप्त केले. बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सहयोगी कंपनी बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीजच्या कार्यालयातून हे पैसे जप्त करण्यात आले.
बीडीपीएल समूह राज्यभरात पसरले आहे. या समूहाच्या बलदेव साहू इंफ्रा प्रायव्हेट लिमिटेड (फ्लाई एँश ब्रिक्स), क्वालिटी बॉटलर्स प्रायव्हेट लिमिटेड (आयएमएफएल बॉटलिंग) आणि किशोर प्रसाद बिजय प्रसाद बेवरेजेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्याही आहेत. तसेच आयकर विभागाने बोलांगीर शहरातील सुदापाडा आणि टिटिलागढ शहरातील अन्य मद्य निर्मिती कंपन्यांच्या मालकांच्या निवासस्थान आणि कार्यालयात छापे टाकले. त्यातूनही मोठी रक्कम मिळाली. ही सर्व रक्कम एक ट्रकमधून बोरिया येथील भारतीय स्टेट बँकत कडक सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आली. आयकर विभागाच्या छाप्याची माहिती मिळताच दीपक साहू आणि संजय साहू हे फरार झाले. त्याचा शोध घेतला जात आहे.