Income Tax Raid : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी आमदार हरवंशसिंह राठोड आणि बीडी कन्स्ट्रक्शन व्यावसायिक राजेश केशरवानी यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने धाडी टाकल्या. यावेळी राठोड यांच्या घरात सोने आणि रोकडसोबत आयकर विभागाला जे सापडले, त्यामुळे त्यांना चांगलाच घाम फुटला. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील राठोड भाजपचे जुने नेते आहेत. त्यांनी राजेश केसरवानीसोबत बेहिशोबी संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. राठोड 2013 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2018 मध्ये ते निवडणुकीत पराभूत झाले होते. 2023 मध्ये भाजपने त्यांना तिकीट दिले नव्हते. त्यांचे वडील हरनामसिंह राठोड हे मंत्रीसुद्धा राहिले आहे. आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यावर त्यांच्या घरात सोने, रोकड रक्कमसोबत चार मगरी मिळाल्या. त्यामुळे आयकर विभागाची टीम हादरली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवले.
आयकर विभागाने शुक्रवारी राठोड यांच्या निवासस्थानी छापा टाकला. त्यावेळी घरात तयार केलेल्या तलावात चार मगरी सापडल्या. त्यानंतर आयकर विभागाने त्याची माहिती वन विभागाला दिली. मध्य प्रदेश वन विभागाचे प्रमुख असीम श्रीवास्तव यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी म्हटले की, आरोपींवर वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच चारी मगरीचे रेस्क्यू करण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यावर त्या सामान्य असल्याचे दिसून आले. त्यांना आता जंगलात सोडण्यात आले आहे.
आयकर विभागाच्या टीमला मोठ्या प्रमाणावर करचोरी पकडण्यात यश आले आहे. आतापर्यंत 155 कोटींची करचोरी पकडली गेली आहे. तीन कोटी रोकड, 14 किलो सोने, चांदी जप्त करण्यात आले आहे. राठोड यांच्याकडेच 140 कोटींची करचोरी पकडली गेली आहे. त्यांचा कंन्स्ट्रक्नशनचा व्यवसाय आहे. आयकर विभागाच्या टीमला या कारवाईमध्ये कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे घबाड मिळाले आहे.
आयकर विभागाला या छाप्या दरम्यान बेनामी मालमत्ता मिळाली आहे. अनेक महत्वाची कागदपत्रेही मिळाली आहेत. या कागदपत्रांचा सखोल तपास सुरू केला आहे.