Income Tax Raid : आयकर विभागाला पुन्हा कुबेरचा खजीना मिळाला आहे. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 40 कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे. नोटांची मोजणी अपूर्ण आहे. उत्तर प्रदेशातील आग्रामधील तीन बुटांच्या व्यापाऱ्यांवर टाकलेल्या छाप्यात ही रक्कम मिळाली आहे. छाप्यादरम्यान बुटांच्या व्यावसायिकांच्या घरी चलनी नोटांचा ढीग मिळाला. त्यात ५०० रुपयांच्या नोटा आहेत. या रक्कमेची मोजणी सुरू आहे. आयकर विभागाने नोटा मोजण्याची जबाबदारी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे.
आयकर विभागाने नोटा मोजण्याचे काम दिलेले अधिकारी रोकड मोजून थकले आहेत, परंतु नोटांची मोजणी पूर्ण झाली नाही. आतापर्यंत 40 कोटी रुपये मोजले गेले आहेत. अजून बरीच रक्कम मोजणी राहिली आहे. या बेहिशेबी संपत्तीची चौकशी सुरु केली आहे. आयकर विभागाला या अधिकाऱ्यांबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर आयकर विभागाच्या टीमने छापेमारी केली आहे.
शनिवारी दुपारी आयकर विभागाने आग्रा, लखनौ आणि कानपूर येथील तीन बुटांच्या व्यावसायिकांच्या सहा ठिकाणी कारवाई केली. यामध्ये आग्रा येथील एमजी रोडवर असलेल्या बीके शूजच्या आस्थापना आणि सूर्यानगर येथील घराची झडती घेण्यात आली आहे. बुटांचा व्यापार करणाऱ्या मंशु फूटवेअर आणि बीके शूजचे मालकांची चौकशी करण्यात येत आहे.
आयकर विभागच्या छापेमारी सुरु असलेल्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. जवळपास राहणाऱ्या लोकांची घरे बंद दिसत आहे. या विषयावर आयकर विभागाचे अधिकारी बोलण्यास तयार नाही. सुमारे 5 तास चाललेल्या या छाप्यात आयकर विभागाच्या पथकाने शोरूमच्या प्रत्येक कोपऱ्याची झडती घेतली. याशिवाय चप्पल व्यापाऱ्याच्या अनेक ठिकाणी आयटी पथकाने छापे टाकले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात करचोरी झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मागील वर्षी काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यातही सुमारे ५०० कोटी रुपये मिळाले होते.