Saurabh Sharma Inside Story: आरटीओ विभागात शिपाई म्हणून नोकरी…पगार 40 हजार…फक्त सात वर्ष नोकरी…त्यानंतर जमवली कोट्यवधींची माया. अगदी धनकुबेर म्हणावे इतकी संपत्ती. लोकायुक्त अन् आयकर विभागाच्या छाप्यात 10 कोटींची रोकड, 52 किलो सोने, 250 किलो चांदी मिळाली. ही काहणी एखाद्या चित्रपटातील नाही. मध्य प्रदेशातील आरटीओ विभागात कधी शिपाई असलेल्या सौरभ शर्मा याने जमवली ही बेहिशोबी संपत्ती आहे. ही संपत्ती म्हणजे हिमनगाचे टोक म्हणावे लागले. अजून बरेच ‘राज’ त्याचे उघडणार आहे. आयकर विभागाच्या हातात आता त्याची एक डायरी आली आहे. त्या डायरीत मध्य प्रदेश आरटीओ विभागातील अनेक जिल्ह्यांच्या आरटीओची नावे आणि नंबर आहेत. त्यांना मिळणाऱ्या रक्कमेची माहिती आहे. अगदी डिसेंबर महिन्याचाही हिशोब त्यात आहे. कोण आहे हा सौरभ शर्मा?, कशी जमवली त्याने ही प्रचंड संपत्ती? पाहू या इनसाईड स्टोरी…
मध्य प्रदेशातील ग्वालियरमधील सामान्य परिवाराशी संबंध ठेवणारा आरटीओचा माजी कॉन्टेबल सौरभ शर्मा याने काही वर्षांतच आपले जीवन बदलले. सात वर्षांच्या नोकरीत त्याने कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले. अर्थात त्यासाठी त्याला मोठे राजकीय नेते अन् वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ मिळाली. मग कॉन्स्टेबल ते बिल्डर झालेल्या सौरभ शर्माने कधी मागे वळून पाहिले नाही. सात वर्ष कॉन्स्टेबल राहिलेला सौरभ शर्माचे कनेक्शन माजी मंत्री, विद्यामान आमदारपर्यंत मर्यादीत नाही. मद्याचा व्यवसाय करणारे व्यापारी, आयएएस अधिकाऱ्यांपर्यंत जात आहे.
सौरभ शर्माचे वडील मध्य प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागात कार्यरत होते. सौरभच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला त्या विभागात अनुकंपावर नोकरी मिळणार होती. परंतु आरोग्य विभागात जागा रिक्त नव्हती. मग आरटीओमध्ये कार्यरत असलेला स्टेनो सौरभ शर्मा याचा नातेवाईक निघाला. त्याने सौरभ शर्माच्या नियुक्तीसाठी लॉबिंग केली. अखेर ऑक्टोंबर 2016 मध्ये तो आरटीओमध्ये कॉन्सटेबल (शिपाई) झाला. आरटीओमध्ये एन्ट्री होताच त्याने डावपेच सुरु केले. त्यामुळे एका माजी मंत्र्याचा तो खास व्यक्ती बनला. नोकरी मिळाल्यानंतर त्याने दोन डझन चेक पाईंटवर ठेकेदारीचे काम मिळवल्याचे सांगितले जात आहे. त्यातून त्याच्याकडे पैशांचा पाऊस सुरु झाला.
सौरभ शर्मा याची दादागिरी वाढू लागली. मग तो इतरांना ठेके देऊ लागला. त्यामुळे आरटीओमधील इतर अधिकाऱ्यांनी त्याला विरोध सुरु केला. परंतु तेव्हा मंत्र्याच्या हस्तक्षेपामुळे त्या अधिकाऱ्यांचे काहीच चालले नाही. परंतु अधिकाऱ्यांनी त्याचे रेकॉर्ड ठेवणे सुरु केले. विभागातील काही लोक त्याचे शत्रू झाले होते. सरकार बदलले. सौरभला ज्याचा वरदहस्त मिळाला त्या मंत्र्यास मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे सौरभ शर्मा याने व्हिआरएस घेतले. व्हिआरएस घेतल्यानंतर त्याने अविरल बिल्डिंग कंस्ट्रक्शन प्राइव्हेट लिमिटेड नावाने कंपनी स्थापन केली. कधी काळी वाहन चालक असलेला चेतन सिंह गौर, शरद जायसवाल आणि रोहित तिवारी या कंपनीत संचालक झाले. 22 नोव्हेंबर 2021 रोजी ही कंपनी सुरु झाली. या कंपनीबाबत माहिती लोकायुक्त अन् आयकर विभागाला मिळाली.
लोकायुक्तची स्पेशल पोलीस एस्टेब्लिशमेंट टिमने 19, 20 डिसेंबर रोजी शर्मा याच्या घरी अन् कार्यालयात छापे टाकले. त्यात उत्पन्नापेक्षा जास्त संपती उघड झाली. त्याच्या घरुन गाड्या, सोने-चांदी, 3.8 कोटी रुपायांची रोकड मिळाली. त्याच्या कार्यालयात 4.1 कोटी रोकड, सोने-चांदी मिळाले. या कारवाईची माहिती सौरभ शर्मा याला आधीच मिळाली होती. त्यामुळे त्याने एमपी 07 बीए 0050 या आरटीओ लिहिलेल्या गाडीत ही संपत्ती ठेवली. ही कार आयकर विभागाला 19 डिसेंबर रोजी मंडोराजवळ जंगलात मिळाली. ही कार चेतन गौर याच्या नावावर रजिस्टर्ड आहे. त्या गा़डीतच 54 किलो सोने आणि दहा कोटी रोकड मिळाली. सौरभ शर्मा त्याची पत्नी दिव्या दुबईत फरार झाली आहे. परंतु सौरभचा उजवा हात समजला जाणारा चेतन याला अटक झाली आहे. त्याच्या नावावर ती गाडी आहे.
20 डिसेंबर रोजी सौरभ शर्मा याच्याकडे 2 क्विंटल चांदी (200 किलो) चांदी मिळाली. ही चांदी ऑफिसच्या टाइल्सच्या खाली होती. लोकायुक्तांनी सतत 17 तास कारवाई करत त्याच्या संपत्तीचा तपास केला. लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सौरभ शर्मा याने त्याची पत्नी दिव्या, आई, वहिनी आणि जवळचे सहकारी चेतन सिंह गौर आणि शरद जैस्वाल इत्यादींच्या नावावर मालमत्ता खरेदी केली आहे. सौरभ शर्माकडे सुरु असलेलली लोकायुक्तांची कारवाई पूर्ण झाली आहे. लोकायुक्त डीजी जयदीप प्रसाद यांनी या प्रकरणात 8000 कोटींची बेहिशोबी संपत्तीची माहिती मिळाल्याचे म्हटले आहे.
सौरभ शर्माचे मायाजाल पाहून या प्रकरणात लोकायुक्त, आयकर विभागानंतर, डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेंस (डीआरआय) अन् अंमलबजावणी संचालनालय (ईडी) एन्ट्री झाली आहे. ईडीने सौरभ शर्मा आणि चेतन सिंह विरोधात प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगनुसार गुन्हा दाखल केला आहे. लोकायुक्तांना छाप्यात 52 किलो सोन्याचे बिस्टीक मिळाल्यावर डीआरआयने हे सोने कुठून आले त्याचा सोर्स शोधण्याचे काम सुरु केले आहे. आयकर विभागला सौरभ शर्मा याची एक डायरी मिळाली आहे. या डायरीत वर्षभरात दिलेल्या पैशांचे विवरण दिले गेले आहे. त्यात 100 कोटींपेक्षा जास्त रक्कमेची माहिती असल्याचे सांगितले जात आहे. मध्य प्रदेशच नव्हे तर उत्तर प्रदेशातील 52 जिल्ह्यांच्या आरटीओचे नाव आणि क्रमांक त्यात आहे. परिवहन विभागातील दिग्गज अधिकाऱ्यांपर्यंत या प्रकरणाचे कनेक्शन जात आहे. या डायरीत अगदी डिसेंबर महिन्याचा हिशोब दिला आहे. यामुळे मध्य प्रदेशातील पूर्ण परिवहन विभाग रडारवर आला आहे.
सौरभ शर्मा याचे घर म्हणजे आलिशान महल आहे. त्याच्या घराची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. त्याने त्याच्या घराच्या सजावट आणि इंटेरिअर डिझायनिंगवर दोन कोटी रुपये खर्च केले. त्यावरुन त्याच्या घराची भव्यता लक्षात येते. एखाद्या मोठ्या उद्योगपतीच्या घराप्रमाणे त्याच्या घरात महागड्या सॅनिटरी वेअर्स, झुंबर आणि इतर चैनीच्या वस्तू आहेत. त्याच्याकडे आलिशान गाड्यांचा ताफासुद्धा आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एक पत्रानंतर सौरभ शर्मा प्रकरणाचा तपास सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. नितीन यांनी 16 जुलै 2022 रोजी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्य सचिव इकबाल सिंह बैस यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात मध्य प्रदेशातील आरटीओ अधिकारी आणि कर्मचारी चेक पोस्टवर मोठ्या प्रमाणावर लाचखोरी करत असल्याचे म्हटले होते. एंट्री पोस्टवर गाडीचे सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतानाही ट्रक चालक आणि मालकांकडून वसुली केली जात आहे. यामुळे मध्य प्रदेशचे नाव खराब होत आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करावी, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. नितिन गडकरी यांनी हे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि तत्कालीन परिवहन मंत्री गोविंद सिंह राजपूत यांनाही पाठवले होते. त्यानंतर कारवाईचे चक्र सुरु झाल्याचे म्हटले जात आहे.
परिवहन विभागात शिपाई असलेल्या सौरभ शर्माने फक्त सात वर्षांच्या नोकरीतून ही माया जमवली. हे सर्व पाहून अनेकांना धक्का बसला. एका शिपाईने जमवलेली संपत्ती ही त्याने फक्त स्वत:च्या बळावर मिळवली का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असणार आहे. त्याच्या मागे अनेक लोक आहेत. राजकीय नेते अन् अधिकारी असल्याशिवाय ही संपत्ती त्याला मिळवता आली नाही. त्याच्याकडे मिळालेल्या संपत्ती अधिकारी अन् नेत्यांचा वाटा असणार आहे. सौरभ शर्मा कारवाईपूर्वीच दुबईत फरार झाला. त्यामुळे त्याला या कारवाईची माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे. आता ही कारवाई फक्त शिपाईपर्यंत मर्यादीत न करता हिमनगापर्यंत जाणे गरजेचे आहे.