नवी दिल्ली | 4 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना पक्षफुटीला आता एक वर्ष झालंय. त्यानंतर गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. तसेच महाराष्ट्र काँग्रेस पक्षातही फूट पडणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. पण काँग्रेस नेत्यांनी संबंधित चर्चांचं खंडन केलं आहे. आम्ही एकसंघ आहोत, असं महाराष्ट्रातील काँग्रेस नेते म्हणत आहेत. या सगळ्या घडामोडींनंतर आता विरोधक सतर्क झाले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. विरोधी पक्षांची नुकतीच काही दिवसांपूर्वी बंगळुरु येथे बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचं इंडिया असं नाव ठेवण्यात आलं. त्यानंतर इंडिया आघाडीची पुढची बैठक मुंबईत होईल, असं जाहीर करण्यात आलं होतं. पण ही बैठक मुंबईत नेमकी कधी होईल? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. विशेष म्हणजे या दरम्यानच्या काळात मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर आता इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या तारखेवर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ही बैठक होणार आहे. मुंबईच्या पवईमधील हॉटेल WEST END येथे बैठक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 25 आणि 26 सप्टेंबरला बैठक घेण्याचं ठरलं होतं. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वेळ नसल्याने पुढील तारीख ठरली. महाविकास आघाडीकडे या बैठकीचं संयोजक पद आहे.
भाजपचं टेन्शन वाढणार?
इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीमुळे भाजपचं देखील टेन्शन वाढू शकतं. कारण आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी प्रभावी अशी रणनीती ठरवली तर त्याचा भाजपला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे या बैठकीकडे भाजपचं देखील लक्ष असणार आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांच्या गोटात हालचाली सुरु झाल्यानंतर सत्ताधारी पक्षही सतर्क झाले आहेत. सत्ताधारी आमदारांची देखील मुंबईत लवकरच बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकांमध्ये कोण काय ठरवतं ते आगामी काळात विविध घडामोडींमधून स्पष्ट होईल.