नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्याकांडावरुन कॅनडाने भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केलं. भारतावर गंभीर आरोप केले. आता तोच कॅनडा चहूबाजूंनी अडकला आहे. कॅनडा विरुद्ध वेगवेगळे देश भारताच्या बाजूने उभे राहत आहेत. भारत आणि कॅनडामधील राजनैतिक वाद टिपेला पोहोचला आहे. दोन्ही देशातील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. आता या यादीत श्रीलंकेच नाव जोडलं गेलय. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो दहशतवाद्यांच समर्थन करतात असं श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी म्हटलं आहे. कॅनडा आणि उत्तर अमेरिका दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याच त्यांनी म्हटलय. “पीएम जस्टिन ट्रूडो यांच्या वक्तव्याने मला अजिबात आश्चर्याचा धक्का बसलेला नाही. कारण तो खोटे आणि अपमानास्पद आरोप करतात. काही दहशतवाद्यांना कॅनडामध्ये सुरक्षित स्थान मिळालय. कॅनडाचे पंतप्रधान कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप करतात.
अशीच गोष्ट त्यांनी श्रीलंके बरोबर सुद्धा केली होती. श्रीलंकेमध्ये नरसंहार झाला, हे पूर्णपणे खोटं आहे. आमच्या देशात अस काहीच झाल नव्हतं” असं श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी ANI शी बोलताना म्हणाले. “ट्रूडो यांच्या ‘नरसंहार’ टिप्पणीमुळे दोन्ही देशातील संबंध बिघडले होते. श्रीलंकेत नरसंहार झाला नाही, हे कॅनडातीलच मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं. तेच एक राजकीय नेते म्हणून पीएम ट्रूडो यांनी नरसंहार झाल्याचा आरोप केला होता. श्रीलंकेने कॅनडाच्या पीएमने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते” असं अली साबरी यांनी सांगितलं.
अजून या देशाच्या परराष्ट्र मंत्र्याने काय सांगितलं?
श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांना एक संप्रभु देशाच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला. “कुठल्याही एका देशाने दुसऱ्या देशात घुसून शासन कसं कराव हे सांगू नये. इतर कोणापेक्षाही आम्ही आमच्या देशावर जास्त प्रेम करतो. ट्रूडोंच वक्तव्य आम्हाला अजिबात पटलेलं नाही. आपल्याला एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. जेणेकरुन शांततापूर्ण वातावरण तयार करता येईल” असं श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी सांगितलं.