Indian Army patrolling in Demchowk area: गेल्या काही वर्षांपासून लडाख, डेपसांग, डेमचौक भागात भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर होते. या काळात दोन्ही सैन्यांमध्ये झटपटसुद्धा झाली होती. त्यामुळे भारत आणि चीन सीमेवर तणाव होता. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्याही सुरु होत्या. नुकतेच रशियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात यासंदर्भात करार झाला. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्याने पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचौक भागात माघार घेतली आहे. त्यानंतर आता शुक्रवारपासून चीन सैन्य माघारी गेलेल्या डेमचौकमध्ये भारतीय लष्कराने पुन्हा गस्त सुरू केली. तसेच देपसांग भागातही लवकरच गस्त सुरु करणार असल्याचे भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले.
भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये पूर्व लडाखमधील डेमचोक आणि डेपसांगमध्ये तणाव होता. लष्कराच्या सूत्रांनी सांगितले होते की, पूर्व लडाखमधील सीमा रेषेवरील दोन स्टँडऑफ पॉइंट डेमचोक आणि डेपसांगमधील दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर दोन्ही देशांनी दिवाळीनिमित्त मिठाईचे अदान प्रदानसुद्धा केले. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
डेमचोकमध्ये भारतीय सैन्याने पेट्रोलिंग सुरू केली आहे. आता हळूहळू भारतीय सैन्याची गस्तीची पातळी एप्रिल 2020 पूर्वीसारखी होणार आहे. पेट्रोलिंगचे स्वरूप अद्याप ठरलेले नाही. यासाठी दोन्ही देशांमध्ये स्थानिक कमांडर स्तरावर चर्चा सुरू राहणार आहे.
विदेश सचिव विक्रम मिस्री यांनी 21 ऑक्टोबर रोजी दिल्लीत सांगितले होते की, भारत आणि चीन दरम्यान एका करारास अंतिम स्वरुप दिले आहे. त्यात 2020 मधील वादाच्या मुद्यांवर तोडगा काढण्यात आला आहे. पूर्वी लडाखमध्ये गस्त सुरु करणे आणि त्या ठिकाणी असलेले सैन्य मागे घेणे, यावर एकमत झाले आहे. गेल्या चार वर्षांपेक्षा जास्त काळापासून सुरु असलेला वाद त्यामुळे निवळला आहे.
जून 2020 मध्ये भारत आणि चीन सैन्यात गलवान घाटीमध्ये हिंसक झडप झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधामध्ये तणाव आला होता. दोन्ही देशांनी तोफा, रणगाडे, लढाऊ विमाने सीमेवर तैनात केली होती.