नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : भारताचं मिशन मून यशस्वी झालं आहे. चांद्रयान -3 यशस्वीपणे चंद्रावर उतरलं आहे. काल म्हणजे 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी यानाने चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं. चंद्रावर उतरताच चांद्रयान-3च्या लँडरने संदेश पाठवला आहे. भारत, मी चंद्रावर पोहोचलो आहे. आणि तुम्ही सुद्धा, असा संदेश विक्रम लँडरने पाठवला आहे. इस्रोने ट्विट करून ही माहिती दिली आहे. बुधवारी भारताने अंतराळात एक इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञानमधून लैस एलएमची सॉफ्ट लँडिंग करण्यात यश मिळालं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे.
भारतीय वेळेनुसार काल संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रयानने चंद्राच्या पृष्ठभूमीवर पाऊल ठेवलं. त्यामुळे भारत हा दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. आतापर्यंत जगातील चार देशच चंद्रावर पोहोचू शकले आहेत. त्यात चीन, अमेरिका, रशिया आणि आता भारताचा नंबर आहे. भारताच्या या मिशन मूनमुळे केवळ भारतालाच नव्हे तर जगाला एक दिशा मिळणार आहे. चंद्रावरील वातावरणाचा संपूर्ण जगाला अभ्यास करता येणार आहे.
भारताने चंद्रावर पाऊल ठेवणं हा अंतराळ क्रांतीचा एक भाग म्हणून पाहिलं जात आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणं हे एक आव्हान होतं. भारताने हे आव्हान पेललं आहे. दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा अनेक देशांनी प्रयत्न केला. पण यश फक्त भारतालाच मिळालं आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोमध्ये एकच जल्लोष झाला. भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेत आहेत. त्यांनी तिथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशवासियांना शुभेच्छा दिल्या. शास्त्रज्ञांच्या कष्टांना सलाम केला.
Chandrayaan-3 Mission:
‘India🇮🇳,
I reached my destination
and you too!’
: Chandrayaan-3Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.Congratulations, India🇮🇳!#Chandrayaan_3#Ch3
— ISRO (@isro) August 23, 2023
भारताने पृथ्वीवर संकल्प केला आणि चंद्रावर जाऊन हा संकल्प पूर्ण केला आहे. भारत आता चंद्रावर पोहोचला आहे. हे यश संपूर्ण मानवतेचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आता आपण चंद्रापाठोपाठ सूर्यावरही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याशिवाय शुक्रावरही आपण जाऊन संशोधन करणार असल्याचं मोदींनी सांगितलं.