इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता तणाव हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. पश्चिम आशियातील या दोन देशातील तणावाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित आहेत. पश्चिम आशियातील संकटावर या बैठकीत चर्चा होणार असून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. इस्रायलने इराणवर बदला घेण्यासाठी हल्ला करण्याची आधीच धमकी दिली आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढू शकतो.
इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलकडून ही हल्ल्याची योजना आणखी जात आहे. पण इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणी लोकांसोबत आपलं कोणतंही वैर नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे इस्रायल काय कारवाई करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. इस्रायलने याआधी हमास आणि हिजबुल्लाहच्या प्रमुखांना ठार करत बदला होता. त्यानंतर आता इराणच्या प्रमुखांची सुरक्षा ही वाढवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या बाठकूत पश्चिम आशियातील सध्याच्या घडामोडी अत्यंत चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. इंधनासह अन्य उत्पादनांच्या पुरवठ्यावर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती देखील पंतप्रधान मोदींनी घेतली. भारताने सर्वांना मुत्सद्देगिरी आणि संवादाद्वारे समस्या सोडवण्याचे आवाहन केले आहे.
एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, या संकटामुळे भारतातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात यामुळे कच्चा तेलाच्या किंमती वाढू शकतात. पश्चिम आशियातील संकटावर भारताने चिंता व्यक्त केली. भारत पश्चिम आशियातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारताची भूमिका देखील या संपूर्ण घडामोडींमध्ये महत्त्वाची ठरु शकते. कारण भारताचे इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांसोबत चांगले संबंध आहेत. इस्रायलने आधीच भारताला मध्यस्थी करण्याचे आवाहन केले आहे.