केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली. तेलंगणातील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना अमित शाह यांनी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना जोरदार प्रत्यूत्तर दिले. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे आणि त्यामुळे भारताने पाकव्याप्त काश्मीरबद्दल (पीओके) बोलू नये. यावर उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, ‘अणुबॉम्बच्या भीतीमुळे त्यांना पीओकेवरील आपला हक्क सोडायचा आहे. पण काळजी करू नका, मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. पाकिस्तानच्या गोळ्यांना तोफेने उत्तर दिले जाईल.
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वर केलेल्या टिप्पणीवर निशाणा साधत शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्ट्राईक केले आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला. रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी पुलवामा घटना रोखण्यात गुप्तचर यंत्रणा अपयशी असल्याचा दावा केला होता.
रेड्डी म्हणाले होते की, ‘पुलवामा घटनेनंतर मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘माझा मोदीजींना प्रश्न आहे, तुम्ही काय करत आहात? पुलवामा घटना का घडली? अंतर्गत सुरक्षेबाबत तुम्ही काय करत आहात? तुम्ही IB, RAW सारख्या एजन्सीचा वापर का केला नाही? हे तुमचे अपयश आहे. सर्जिकल स्ट्राईक प्रत्यक्षात झाला की नाही हे कोणालाच माहीत नाही, असा सवाल रेवंत रेड्डी यांनी केला.
अमित शाह म्हणाले, ‘संसदेने एकमताने ठराव मंजूर केला की पीओके हा भारताचा भाग आहे. तुम्ही (काँग्रेस) आता अणुबॉम्बबद्दल बोलून पीओकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. पीओकेची प्रत्येक इंच जागा भारताची आहे आणि भारताचीच राहील.
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ते म्हणतात, ‘भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे कारण त्याच्याकडे अणुबॉम्ब आहेत. जर आपण त्याचा आदर केला नाही तर तो अणुबॉम्ब वापरण्याचा विचार करेल.