India maldive row : मालदीवचा भारताला मोठा झटका, आता भारत काय उचलणार पाऊल

| Updated on: Feb 15, 2024 | 3:04 PM

India maldive row : भारतासोबतचे संबंध बिघडल्यानंतर मालदीव देखील सतत भारत विरोधी भूमिका घेत आहे. मालदीवमध्ये चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष सत्तेत आल्याने हा परिणाम होत आहे. भारताविरोधात भूमिका घेतल्याने भारताने देखील विविध स्तरावर नाराजी दर्शवली आहे. पण आता मालदीवने आणखी एक भारत विरोधी निर्णय घेतला आहे.

India maldive row : मालदीवचा भारताला मोठा झटका, आता भारत काय उचलणार पाऊल
Follow us on

India maldive row : भारत आणि मालदीव यांच्यात तणावाचे वातावरण असतानाच मालदीवने भारताला झटका दिला आहे. मालदीवने ४३ भारतीयांना देशातून बाहेर काढण्याची घोषणा केली आहे. मालदीवमध्ये वेगवेगळे गुन्हे केल्याचा आरोप करत  त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मालदीव मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, मालदीवने 12 देशांतील एकूण 186 नागरिकांना देशातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये चीनच्या एकाही नागरिकाचा समावेश नाही.

देश सोडण्याच्या सूचना

सर्वाधिक 83 बांगलादेशी नागरिकांना बाहेर काढण्यात येणार आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय, तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकन ​​आणि चौथ्या क्रमांकावर नेपाळचे नागरिक आहेत. या लोकांना देश सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मालदीवच्या गृहमंत्रालयाने देशात बेकायदेशीरपणे सुरू असलेले व्यवसाय बंद करणार असल्याचे सांगितले होते. ज्या व्यवसायातील पैसे परदेशी लोकांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत असे व्यवसाय बंद केले जाणार असल्याचं म्हटलं होतं. यादरम्यान, ते व्यवसाय देखील लक्ष्य केले जातील जे दुसऱ्याच्या मालकीचे आहेत परंतु परदेशी नागरिक चालवत आहेत.

असे व्यवसाय केले जाणार बंद

मालदीवचे होमलँड सिक्युरिटी मिनिस्टर अली इहुसान म्हणाले की, व्यवसाय दुसऱ्याच्या नावाने नोंदणी केल्यानंतर ते परदेशी नागरिक चालवतात. व्यवसायातून झालेला नफा ते स्वतःच्या खात्यात जमा करतात. आता आम्ही असे व्यवसाय बंद करत आहोत आणि ते चालवणाऱ्या परदेशी लोकांना त्यांच्या देशात परत पाठवत आहोत. मालदीवमध्ये डिसेंबर 2021 मध्ये आणलेल्या कायद्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोहम्मद मुइज्जू हे 2023 मध्ये मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून भारत आणि मालदीव यांच्यातील तणाव वाढतच आहे. राष्ट्राध्यक्ष होताच मुइझ्झू यांनी 88 भारतीय सैनिकांना देशातून बाहेर काढण्याची घोषणा केली. भारतासोबत झालेल्या बैठकीनंतर यासाठी १० मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मुईज्जू हे चीन समर्थक असल्याने ते सतत भारतविरोधी भूमिका घेत आहेत.

भारतासोबतचा करार ही रद्द

मालदीवने भारतासोबत जल संशोधन कराराचे नूतनीकरणही रद्द केले आहे. भारताचे नाव न घेता मुइज्जू म्हणाले होते – आम्ही कोणत्याही देशाला आमच्या सार्वभौमत्वात हस्तक्षेप करू देणार नाही.

भारताविरोधी भूमिका घेतल्याने मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत देखील घट झाली आहे. याआधी सर्वाधिक भारतीय पर्यटक मालदीवला जात असत. जानेवारी 2024 मध्ये समोर आलेल्या आकडेवारीत मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या 5 व्या स्थानावर पोहोचली आहे.