India Maldives Row : भारत आणि मालदीव यांच्यात गेल्या काही महिन्यात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडलेत. मुइज्जू यांच्या ‘इंडिया आउट’ घोषणेमुळे त्यांना मालदीवलाच उद्ध्वस्त केले आहे. भारतानेही मालदीववर बहिष्कार टाकला. त्यामुळे तेथील पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला. मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. मालदीवमध्ये सर्वाधिक पर्यटकांची संख्या ही भारतीयांची असायची. जी आता सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. एक भारतीय कमीत कमी १ लाख रुपये तरी मालदीवमध्ये खर्च करत होता. आता भारत आणि मालदीव यांच्यातील तणावाचा इतर देशांना फायदा होतांना दिसत आहे.
भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकल्यानंतर याचा फायदा श्रीलंकला होताना दिसत आहे. श्रीलंकेच्या पर्यटन उद्योगावर सकारात्मक परिणाम झाल्याचे श्रीलंकेचे पर्यटन मंत्री हरिन फर्नांडो यांनी म्हटले आहे. फर्नांडो म्हणाले की, मालदीवमध्ये सुरू असलेल्या परिस्थितीचा अनवधानाने श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्राला फायदा झाला आहे.
2023 – जानेवारी महिन्यात 13,759 भारतीय प्रवाशांनी श्रीलंकेला भेट दिली होती. या वर्षी जानेवारीमध्ये ती 34,399 झाली.
2023 – फेब्रुवारीमध्ये 13,714 लोक श्रीलंकेला गेले होते, तर यावर्षी ही संख्या 30,027 झाली आहे.
2023 – मार्चमध्ये 18,959 च्या तुलनेत यावेळी 31,853 भारतीयांनी श्रीलंकेला भेट दिली आहे.
2023 – एप्रिलमध्ये 19,915 लोकांनी श्रीलंकेला भेट दिली होती, तर यावर्षी 27,304 भारतीयांनी श्रीलंकेला भेट दिली आहे.
उल्लेखनीय आहे की भारत आणि मालदीवमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. मालदीवच्या पर्यटनमंत्र्यांनी भारतीयांना मालदीवमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. यावरुन परिस्थिती किती बदलली आहे याचे संकेत मिळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यांनी सोशल मीडियावर लोकांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले होते. त्यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर भारतीयांनी बॉयकॉट मालदीव ट्रेंड सुरू झाला. तेव्हापासून मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
2023 मध्ये मालदीवसाठी सर्वात मोठी बाजारपेठ भारत होता. आता चीन, रशिया, युनायटेड किंगडम, इटली आणि जर्मनी या देशांनंतर भारत सहाव्या क्रमांकावर आहे. श्रीलंका आणि भारत यांच्यातील मजबूत संबंधांवर प्रकाश टाकत फर्नांडो यांनी श्रीलंकेकडून भारतीय पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवरही भर दिला.
फर्नांडो यांनी भाकीत केले की 2030 पर्यंत, भारतीय पर्यटक श्रीलंकेत सर्वाधिक खर्च करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर येतील. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही भारत आहे. श्रीलंकेला त्याचा नक्कीच फायदा होत आहे. भारतीय कंपन्यांनी या बेटावर भरीव गुंतवणूक केली आहे. मोठ्या हॉटेल चेन ITC ने भारताबाहेर श्रीलंकेत पहिले हॉटेल उघडले आहे.