भारत आणि मालदीव यांच्यातील द्विपक्षीय संबंधात तणाव निर्माण झाला आहे. मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू यांनी चीनमुळे भारताच्या संबंधात कटुता निर्माण केली. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटकांना लक्षद्वीपमध्ये पर्यटनासाठी येण्याचे आवाहन केले. त्यानंतर मालदीवमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत घट झाली. त्याचा धक्का मालदीवला बसला आहे. आता मालदीवच्या पर्यटन मंत्र्यांनी भारतीयांना आवाहन केले आहे. मालदीवमध्ये पर्यटनासाठी येऊन देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पर्यटनमंत्र्यांनी भारत आणि मालदीवच्या ऐतिहासिक संबंधांवरही भर दिला. एकंदरीत भारताशी पंगा घेणे मालदीला महागात पडले आहे.
6 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या X हँडलवर लक्षद्वीपचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. त्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्या तीन मंत्र्यांची सरकारमधून हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु भारतीयांनी बायकॉट मालदीव मोहीम सुरु केली. त्याचा चांगलाच फटका मालदीवला बसला आहे.
मालदीवचे पर्यटन मंत्री इब्राहिम फैसल यांनी एका विशेष मुलाखतीत सांगितले की, आमच्या नव्या सरकारलाही भारतासोबत काम करायचे आहे. आम्ही नेहमी शांतता आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचे समर्थन करतो. आमचे सरकार भारतीय पर्यटकांचे मनापासून स्वागत करणार आहे. पर्यटन मंत्री या नात्याने मला भारतीयांना सांगायचे आहे की, कृपया मालदीवच्या पर्यटनाचा एक भाग व्हा. आमची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या चार महिन्यांत भारतातून मालदीवमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 42 टक्क्यांनी घट झाली आहे. भारतीय पर्यटकांनी टाकलेल्या बहिष्काराचा परिणाम मालदीववर झाला आहे. मालदीवमध्ये सर्वाधिक पर्यंटक भारतातून जात होते. वर्षाच्या सुरुवातीला मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीय अव्वल होते, मात्र दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण झाल्यामुळे भारतीय पर्यटकांची संख्या सहाव्या क्रमांकावर पोहोचली.