India maldive row : भारत आणि चीनचे संबंध आधीच खराब आहेत. त्यानंतर चीन मालदीवला भारतापासून लांब करण्याचा प्रयत्न करत आहे. मालदीवमध्ये सरकार बदलल्यानंतर आणि चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष झाल्याने आता मालदीव आणि भारत या दोन देशांमधील संबंध देखील बिघडले आहेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष जर सार्वभौमत्वाची भाषा करत असले तरी त्यांना चीनचा पाठिंबा असल्याने ते भारतविरोधी भूमिका घेऊ लागले आहेत. भारताने देखील मालदीवला धडा शिकवण्याचा प्रण घेतलेला दिसत आहे. भारत भविष्यात मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना आता चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत दिसत आहे.
मालदीवपासून अवघ्या ५०७ किमी अंतरावर असलेल्या लक्षद्वीपमधील मिनिकॉय येथे भारत पुढील आठवड्यात हवाई आणि नौदल तळ INS जटायूचे उद्घाटन करणार आहे. भारताचा हा नौदल तळ आता भारतासाठी मालदीवचा पर्याय बनणार आहे. मालदीवचे हिंद महासागरातील स्थान महत्त्वाचे होते. म्हणून भारत त्याला इतके महत्त्व देत होता. पण आता भारतानेच लक्षद्वीप बेटावर नवीन तळ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
लक्षद्वीपमध्ये या भारतीय नौदल तळाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर राफेलसारखी भारताची सर्वात प्राणघातक लढाऊ विमाने लक्षद्वीपमध्ये उतरू शकतील. त्यामुळे मालदीवमधील मुइज्जू सरकारला या भारतीय लढाऊ विमानांची गर्जना ऐकू येईल. याचा परिणाम संपूर्ण पश्चिम हिंदी महासागरात दिसून येईल. कारण या क्षेत्रात चीनची गुप्तहेर जहाजे आणि युद्धनौका येत राहतात. या भागात चीन आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा हा डाव भारत हाणून पाडणार आहे.
मालदीवमधून भारतीय सैनिकांना मायदेशी परत बोलवण्याची सूचना मुइज्जू यांनी केली होती. हे भारतीय सैन्य आता माघारी येत असतानाच भारत हा नौदल तळाचे उद्घाटन पुढील आठवड्यात करणार आहे. ‘इंडिया आऊट’चा नारा देणारे मुइज्जू यांना मात्र भारतासोबतचा पंगा महागात पडणार आहे. मुइज्जूने मालदीवच्या भारतासोबतच्या मैत्रीत विष कालवले आहे. आता मालदीव चीनच्या इशाऱ्यावर चालत आहे. भारत दौऱ्याऐवजी चीनचा आधी दौरा करणारे मुइज्जू यांचा मनसुबा भारताला कळाला आहे. आधीच कर्जात बुडालेल्या मालदीवला मुइज्जू आणखी कर्जात ढकलत आहे.
मालदीवने तुर्कीशी कोट्यवधी डॉलर्सच्या ड्रोन करारावर स्वाक्षरी केली आहे. भारताला लागून असलेल्या सीमेवर तो हे ड्रोन तैनात करणार आहे. पण भारत आता मालदीवला लागून असलेल्या सीमेवर अख्खं तळच बनवत आहे. ज्यामुळे लढाऊ विमाने कधीही तेथे उतरु शकतात.
हिंदी महासागरातून दळणवळण करण्यासाठी दोन महत्त्वाच्या सागरी मार्ग आहेत जे आग्नेय आशिया आणि दुसरी पश्चिम आशिया. हे मार्ग मालदीवच्या दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील टोकांवर आहेत. त्यामुळे मालदीवला भारत इतके महत्त्व देत आहे. चीनचा देखील याच्यावरच डोळा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा प्रवाहासाठी या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. आता भारत लक्षद्वीप बेटांना आणखी मजबूत तर करणारच आहे पण पर्यटनाच्या दृष्टीने देखील त्याला विकसित करणार आहे. ज्यामुळे भारताचे वर्चस्व हिंद महासागरात वाढणार आहे.