मुंबई | 26 जुलै 2023 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतोय. हवामान खात्याकडून राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तसेच काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे देशभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाचे वैज्ञानिक आर. के. जेनामणी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. दक्षिण ओडिशा, पश्चिम मध्य खाडीवर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे देशभरातील विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ओडिशामध्ये मुसळधार पाऊस होत असून राज्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, अशी माहिती आर. के. जेनामणी यांनी दिली.
हवामान विभागाने महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, पंजाब आणि केरळ या राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. या जिल्ह्याना 60 टक्के आणि त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
हवामान विभागाकडून राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, जम्मू-काश्मीर, आसाम या राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 20 ते 59 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
#WATCH | IMD Senior Scientist RK Jenamani says, “We have well-marked low pressure over still South Odisha, North Andhra coast over West Central Bay and Adjourning Northwest Bay. So because of that the rainfall has been heavy to very heavy, isolated extremely heavy. We have the… pic.twitter.com/4IRMU5t22T
— ANI (@ANI) July 26, 2023
हवामान विभागाने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा किनारपट्टी परिसर, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तेलंगणा या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेश या भागांमध्ये पुढच्या तीन दिवसांमध्ये मुसधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात उद्यासाठी गडचिरोली, चंद्रपूर, सातारा, पुणे, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा अलर्ट आज आणि उद्यासाठी असणार आहे. तर 28, 29 जुलैसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.