मुंबई : देशामध्ये सातत्याने कोरोना (Corona) रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. दररोज येणारी आकडेवारी धडकी भरवणारी आहे. गेल्या 24 तासांमध्ये नव्या कोरोना रूग्णांची संख्या ही 8,084 झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 10 कोरोना रूग्णांचा मृत्यू झालाय. आताच्या आकडेवारीनुसार देशात आता एकून सक्रिय रूग्णांची (Patient) संख्या ही 47,995 वर पोहचली आहे. दररोजचा सकारात्मक रेट 3.24% आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. मागील काही महिन्यात देशातील कोरोना रूग्ण संख्येमध्ये मोठी घट झाल्याचे बघायला मिळाले होते. मात्र, सध्याची देशातील (India) आकडेवारी बघता चाैथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईमध्ये देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. आता राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या ही 16,370 इतकी झाली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये कोरोनाचे रूग्ण जास्त आढळत आहेत. पुण्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या 1128 इतकी आहे. राज्यातील सर्वात जास्त रूग्ण हे एकटा मुंबई शहरामध्येच आहेत. दोन वर्षांपूर्वी देशामध्ये कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याने लाॅकडाऊन करण्याची वेळ आली होती. त्यानंतर कोरोनाची रूग्ण संख्या आटोक्यात आली आणि हळूहळू कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले. आता राज्यामध्ये कोणतेही कोरोना निर्बंध नाहीयेत.
राज्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जी नियमावली लावण्यात आली होती, त्याचा फायदा झाला होता. कारण कोरोनाचे निर्बंध लावल्यानंतर राज्यातील कोरोना रूग्ण संख्या कमी झाली होती. आता कुठलेही निर्बंध नाहीयेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क देखील वापरले जात नाहीत. यामुळे कोरोनाच्या रूग्णांची आकडा हा सतत वाढतच आहे. राज्यातील शाळा देखील आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. लग्न, पार्ट्या सुरू असल्याने संसर्ग वाढत असल्याचे सांगितले जात आहे. राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी कालच सांगितले की, पुढील काही दिवस अजून रूग्ण संख्या वाढले, मात्र, त्यानंतर कमी होईल.