सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्ष सुरु आहे. सीमावर्ती भागात दोन्ही देशांमध्ये युद्धासारखी स्थिती आहे. तेहरीक-ए-तालिबान या पाकिस्तान विरोधी दहशतवादी गटाला अफगाणिस्तानात आश्रय मिळतोय, त्यावरुन हा संघर्ष आहे. 24 डिसेंबरच्या रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या लमानसह अनेक गावांना लक्ष्य केलं. पाकिस्तानने थेट एअर स्ट्राइक केला. यात 15 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्याची तालिबानने शपथ घेतली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानात हा जो एअर स्ट्राइक केला, त्यावर आता भारताची भूमिका समोर आली आहे.
पाकिस्तानकडून अफगाणिस्तावर हा जो हल्ला करण्यात आला, त्याची भारताने निंदा केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे रणधीर जायस्वाल म्हणाले की, “अफगाणि नागरिकांवर पाकिस्तानचा एअर स्ट्राइक निंदनीय आहे. अपयशासाठी शेजाऱ्यांना जबाबदार धरणं ही पाकिस्तानची जुनी सवय आहे” पाकिस्तानी हल्ल्यात लहान मुलं आणि महिलांचा मृत्यू झाला. पाकिस्तानने अफगाणिस्तानातील टीटीपी कॅम्पना टार्गेट करुन हा हल्ला केला होता.
पाकिस्तानी पत्रकार नजीम सेठी काय म्हणाले?
उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. त्यानंतर पुलावामा घडलं. भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला. आता पाकिस्तानी पत्रकार नजीम सेठी यांनी एका चॅनलवर बोलताना भारताकडून या दोन्ही कारवाया झाल्याच मान्य केलं. भारताकडूनच हे शिकल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानात एअर स्ट्राइक केल्याच सांगितलं.
आपण भारताकडून शिकलोय
पाकिस्तानी चॅनलवर ते बोलतानाची छोटीशी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतेय. सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर ‘पाक अनटोल्ड’ नावाच्या अकाऊंटवरुन ही व्हिडिओ क्लिप शेअर करण्यात आलीय. यात सर्जिकल स्ट्राइक झाल्याच त्यांनी मान्य केलं. नजीम सेठी म्हणाले की, “अलीकडेच पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसून हल्ला केला. हे सगळ आपण भारताकडून शिकलोय”
पाकिस्तानी सैन्याने धडा घेतला
“भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमधून पाकिस्तानी सैन्याने धडा घेतला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अफगाणि सैन्याला धडा शिकवण्यासाठी हवाई हल्ला केला. TTP च्या लीडर्सना टार्गेट करुन संपवायचं हे भारताकडूनच शिकलो” असं नजीम सेठी आपल्या इंटरव्यूमध्ये म्हणाले.