नवी दिल्ली | दि. 5 मार्च 2024 : भारत आणि मालदीव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव होता. दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. चीनच्या दबावात येऊन मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवमधून भारतीय सैन्य, विमाने अन् हेलिकॉप्टर माघारी बोलवण्याची मागणी केली होती. परंतु भारताने कुटनीती वापरत मालदीव धडा दिला आहे. यामुळे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांची कोंडी झाली आहे. भारल मालदीवजवळ असलेल्या लक्षद्वीपमधील मिनिकॉय या ठिकाणी नौदल बेस सुरु करत आहे. यामुळे मालदीवची चांगलीच अडचण होणार आहे.
मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांनी चीनला खूश करण्यासाठी भारतीय सैनिकांना देशातून बाहेर जाण्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेले. आता भारत या भागांत नौदलाचे तळ निर्माण करत आहे. यासंदर्भात नौदलाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली. नौदलाने दिलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, मालदीव आणि चीनची जवळीक भारतासाठी चिंता निर्माण करणारी आहे. त्यामुळे भारत आता लक्षद्वीपमधील मिनिकॉय येथे आपले लष्करी तळ सुरु करत आहे. यामुळे या परिसरात भारताच्या निगराणीचा विस्तार होईल. भारताच्या लक्षद्वीप बेटांवर 6 मार्चपासून हा तळ सुरु होणार आहे. सध्याच्या लहान तुकडीला स्वतंत्र नौदल युनिटमध्ये भारतीय नौदल रूपांतरित करणार आहे, असे नौदलाच्या निवेदनात म्हटले आहे.
भारताचे लक्षद्वीपमधील मिनिकॉय मालदीवच्या उत्तरेस सुमारे 130 किलोमीटर अंतरावर आहे. या बेटावर नवीन नौदल तळ बांधला गेले आहे. हे तळ मालदीवच्या सर्वात जवळच्या ठिकाणी आहे. तसेच लक्षद्वीपच्या कावरत्ती बेटावर भारतीय नौदलाचा आधीच तळ आहे. परंतु नवीन तळ मालदीवपासून अधिक जवळ असणार आहे.
लक्षद्वीपमध्ये नवीन तळ निर्माण करण्याचा अर्थ म्हणजे या ठिकाणी लवकर भारत आपले लढाऊ विमान तैनात करेल. त्यामुळे हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भागात भारताची परिस्थिती अधिक मजबूत होईल. मिनिकॉय बेटावर बांधलेला हा नौदल तळ या आठवड्यात भारतीय नौदलाकडे सुपूर्द केला जाणार आहे. या तळाच्या निर्मितीनंतर मालदीव भारताला ब्लॅकमेल करू शकणार नाही, कारण हिंदी महासागरात भारतासाठी त्याचे महत्त्व खूपच कमी राहणार आहे, असे तज्ञांचे मत आहे.