ज्या विमानाने पाकिस्तानच्या F-16 विमानाला पाडलं त्यावर तात्पुरती बंदी! कारण…

| Updated on: May 20, 2023 | 9:01 PM

चार वर्षांपूर्वी मिग-21 विमानाने भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या एफ-16 या लढाऊ विमानाला जमिनीवर पाडलं होतं. तत्कालीन विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे त्या विमानाचे वैमानिक होते.

ज्या विमानाने पाकिस्तानच्या F-16 विमानाला पाडलं त्यावर तात्पुरती बंदी! कारण...
Follow us on

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवर सातत्याने वेगवेगळ्या हालचाली घडत असतात. चार वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या विमानाने LOC मध्ये प्रवेश करत भारतात घुसण्याचा प्रयत्न केला होता. पण पाकिस्तानचा तो डाव भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. भारतीय हवाई दलाचे तडफदार तत्कालीन विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानच्या F-16 विमानाला खाली जमिनीवर पाडलं होतं. अभिनंदन हे त्यावेळी मिग-21 विमान चालवत होते. मिग-21 विमानाच्या आधारेच त्यांनी पाकिस्तानच्या F-16 विमानाला पाडलं होतं. त्यामुळे मिग-21 विमान चांगलंच चर्चेत आलं होतं. पण आता भारतीय हवाई दलाने याच विमानावर बंदी आणल्याची माहिती मिळत आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे.

भारतीय वायूसेनेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वायूसेनेकडून MIG-21 या लढाऊ विमानाच्या उड्डाणावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. वायुसेनेने मिग 21 विमानांचे वारंवार होणारे अपघात लक्षात घेता याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राजस्थानमध्ये नुकतंच हनुमानगढ येथे मिग-21 हे विमान क्रॅश झालं होतं. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची सध्या चौकशी सुरु आहे. या प्रकरणाची जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मिग-21 च्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे.

भारतीय वायूसेनेकडे मिग-21 चे 50 विमानं

भारतीय वायुसेनेकडे सध्याच्या घडीला मिग-21 चे तीन स्क्वॉड्रन आहेत. यामध्ये 50 विमानांचा समावेश आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या कारणास्तव वायुसेनेने आतापर्यंत अनेक स्क्वॉड्रनवर बंदी घातली आहे. गेल्यावर्षीच वायुसेनेकडून सांगण्यात आलं होतं की, तीन वर्षात इतर स्क्वॉड्रनलाही रिटायर केलं जाईल. पण तरीही मिग-21 या विमानाची गोष्टच न्यारी आहे. या विमानाची गती ही आवाजापेक्षाही जास्त आहे. हल्ला करणाऱ्याला रोखण्याची क्षमता या विमानात आहे. पण या विमानांच्या अपघातांची संख्या देखील जास्त आहे.

गेल्या 60 वर्षांमध्ये 400 पेक्षा जास्त अपघात

मिग-21 विमानाचा वेग जास्त असला तरी गेल्या काही दशकांमध्ये या विमानाच्या अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 1963 मध्ये पहिल्यांदा मिग-21 हे विमान भारतात रशियाकडून खरेदी करण्यात आलं होतं. सुरुवातीला हे विमान सिंगल इंजिनचं होतं. पण नंतर या विमानाचे अनेक व्हेरिएंट भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले आहेत. तसं असलं तरीही गेल्या 60 वर्षांमध्ये मिग 21 विमानाचे 400 पेक्षा जास्त अपघात घडले आहेत. विशेष म्हणजे या अपघातांमध्ये आतापर्यंत 170 वैमानिकांचा मृत्यू झालाय. तर 60 पेक्षा जास्त इतरांचा मृत्यू झालाय.

2006 मध्ये या विमानाला अपग्रेड करण्यात आलं

विशेष म्हणजे रशियाच्या हवाई दलाने 1985 मध्येच या विमानाला सर्व्हिसमधून हटवलं होतं. पण भारत अजूनही या विमानाचा वापर करत आहे. या दरम्यान 2006 मध्ये या विमानाला अपग्रेड करण्यात आलं आणि काही नवे फिचर्स या विमानात जोडण्यात आले होते. यामध्ये चांगली इलेक्ट्रॉनिक उपकरणं, शक्तिशाली रडार, युद्ध सामग्री असे अनेक नवे फिचर्स समाविष्ट करण्यात आली आहे. अपग्रेड करण्यात आलेल्या विमानाला नंतर मिग-21 बाईसन असं नाव देण्यात आलं आहे.

मिग-21 विमानाच्या प्रत्येक अपघातानंतर हे विमान चर्चेत येतं. चार वर्षांपूर्वी देखील हे विमान चांगलंच चर्चेत आलं होतं. पण त्यावेळी कारण काहीसं वेगळं होतं. चार वर्षांपूर्वी मिग-21 विमानाने भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या एफ-16 या लढाऊ विमानाला जमिनीवर पाडलं होतं. तत्कालीन विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे त्या विमानाचे वैमानिक होते. त्यांनीच ही कामगिरी केली होती. त्यांच्या या शौर्याच्या निमित्ताने त्यांना भारत सरकारने वीर चक्राने सन्मानित केलं होतं.