श्रीनगर | 18 ऑगस्ट 2023 : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हैदोस सुरु आहे. काही अतिरेकी पाकिस्तानातून भारतातत घुसखोरी करतात आणि घातपाताचा डाव आखतात. पण त्यांचे कुकृत्यांचे डाव भारतीय सैन्य उधळून लावत आहे. अनंतनागच्या कोकरनाथ येथे गेल्या सहा दिवसांपासून हेच सुरु आहे. कोकरनाग येथे भारतीय सैन्य दल, पोलीस एकत्रितपणे दहशतवाद्यांच्या विरोधात शोध मोहीम राबवत होते. यावेळी दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात तीन वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी शहीद झाले. संबंधित घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे.
दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारतीय सुरक्षा यंत्रणेचे तीन बडे अधिकारी शहीद झाल्याने भारतीय सैन्य दलही आक्रमक झालंय. भारतीय सैन्य दलाकडून गेल्या सहा दिवसांपासून ‘ऑपरेशन गॅरोल’ सुरु आहे. दहशतवादी गॅरोल या गावात लपून बसले होते. त्यामुळे या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन गॅरोल असं ठेवण्यात आलं आहे. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्य दहशतवाद्यांना पळवून-पळवून यमसदनी पाठवत आहेत. यासाठी भारतीय सैन्य ड्रोन आणि रॉकेट लॉन्चरच्या मदतीने बॉम्बचे हल्ले करत आहे.
भारतीय सैन्याने आज सकाळी पुन्हा दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर सुरक्षा दलांना एक जळालेलं शरीर मिळालं आहे. मृतदेहावरील कपडे पाहिल्यानंतर ते मृतदेह दहशतवाद्याचंच असल्याचा भारतीय सैन्याचा दावा आहे. अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी आजसुद्धा ड्रोनची मदत घेण्यात आली. भारतीय सैन्याकडून अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.
भारतीय सैन्य आणि अतिरेक्यांमध्ये कालदेखील भीषण गोळीबार झाला होता. त्यानंतर अतिरेकी पळून गेल्याचा अंदाज आहे. याशिवाय अतिरेक्यांकडून आज सकाळपासून गोळीबार झालेला नाही. या अतिरेक्यांचा शोध अजूनही सुरुच आहे. ज्या परिसरात शोध मोहीम सुरु आहे, तो परिसर भारतीय सैन्यासाठी खूप आव्हानाचा आहे.
कोकरनाग येथील जंगलात दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवणं फार जोखमीचं काम आहे. प्रचंड दाटीवाटीच्या झाडांचं घनदाट जंगल आणि लांबच लांब डोंगररांगा, यामुळे या परिसरात अतिरेक्यांचा शोध घेणं खूप आव्हानाचं काम आहे. दोन ते तीन अतिरेक्यांचा संपू्र्ण जंगलात शोध घेणं कठीण आहे. पण भारतीय सैन्याने अद्यापही हिंमत सोडलेली नाही.
भारतीय सैन्य या दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. या दहशतवाद्यांच्या विरोधातील गोळीबारात लष्करातील दोन बडे अधिकारी आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एका डीएसपी शहीद झाले आहेत. त्यामुळे भारतीय सैन्याचे जवान चांगलेच आक्रमक झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याचा जिथे गोळाबार सुरु आहे तो परिसर पीर पंजाल डोंगरी भागात येतो. हा भाग मुजफ्फराबाद येथून किश्तवाडपर्यंत पसलेला आहे. जवळपास 170 किमीचा हा परिसर आहे. विशेष म्हणजे या परिसरात अनेक गुहा आहेत. याच गुहांमध्ये अतिरेकी लपून बसलेली असतात.
या गुहांमधून दहशतवादी सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करुन घातपाताचा डाव घडवून आणला जाऊ शकतो. त्यामुळे ही लढाई सोपी नाहीय. सैन्याकडून ड्रोनच्या साहाय्याने मदत घेतली जात आहे. हे सर्च ऑपरेशन आणखी किती वेळ चालेल याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण गेल्या सहा दिवसांपासून हे ऑपरेशन सुरु आहे.