लडाख | 19 ऑगस्ट 2023 : लेहमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय सैन्याच्या एका ट्रकचा भीषण अपघात झालाय. या ट्रकमध्ये 2 ज्युनियर कमिशन ऑफिसर आणि 7 जवान होते. क्यारी शहरापासून 7 किमी अंतरावर अपघाताची दुर्घटना घडली. भारतीय सैन्याचं ट्रक थेट दरीत कोसळलं. या दुर्घटनेत गाडीतील सर्व 9 जवानांचा मृत्यू झाला. हे सर्व जवान कारु गॅरीसन येथून लेहच्या क्यारी शहाराच्या दिशेला जात होते. यादरम्या ही दुर्घटना घडली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याची एक रुग्णवाहिका आणि आणखी काही वाहनं क्यारी शहाराच्या दिशेला जात होती. या दरम्यान एका ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रक थेट दरीत कोसळला. या अपघातात ट्रकमधील सर्व 9 जवान शहीद झाले. एकूण 34 जवान क्यारी शहराच्या दिशेला जात होती. त्यापैकी 9 जणांचा दुर्देवी अपघातात मृत्यू झालाय.
भारतीय सैन्याचा ताफा लेहच्या न्योमा येथून क्यारीच्या दिशेला जात होता. या दरम्यान घाटात संध्याकाळी पावणे सहा ते सहा वाजेच्या दरम्यान अपघाताची घटना घडली. सैन्याच्या ताफ्यातील एक ट्रक थेट दरीत कोसळलं. या ट्रकमध्ये 10 जण होते. त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झालाय.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर दु:ख व्यक्त केलं आहे. “लडाखमध्ये लेहच्या जवळ घडलेल्या एका दुर्घटनेत भारतीय सैन्याच्या जवानांचा मृत्यू झाल्याच्या बातमीमुळे खूप दु:खी झालोय. राष्ट्रासाठी या जवानांनी केलेली सेवा आम्ही कधीच विसरणार नाहीत. मृतक जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमी जवानांवर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो”, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी दु:ख व्यक्त केलंय.