चेन्नई | 5 जानेवारी 2023 : भारतीय नौदलाने अरबी समुद्रात एमवी लीला नॉरफॉक जहाजाचं हायजॅक करणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडला आहे. एमवी लीला नॉरफॉक हे भारतीय नौदलाचं मालवाहू जहाज आहे. समुद्री डाकूंनी या जहाजाचं सोमालिया बंदरावर अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. पण या जहाजाला हायजॅक करण्यात आरोपींना यश आलं नाही. भारतीय नौदलाने एक स्पेशल ऑपरेशन करुन जहाज हायजॅक करणाऱ्यांची पळता भुई थोडी केली. हायजॅकर पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यांचा शोध नौदलाकडून सुरु आहे. पण भारतीय नौदलाच्या या धाडसी ऑपरेशनमुळे जहाजामधील 21 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. यामध्ये 15 भारतीयांचा समावेश आहे.
भारतीय नौदलाकडून कारवाईचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. स्पेशल फोर्स ओळख असलेल्या मार्कोस कमांडोंनी ही मोठी कारवाई केली आहे. या जहाजावर लायबेरियाचा झेंडा लावण्यात आला होता. भारतीय नौदलाच्या जवानांनी जहाजातील 21 जणांची सुटका केल्यानंतर जहाजाची झडती देखील घेतली आहे. जहाजात कोणतीही संशयास्पद वस्तू तर नाही ना, याची शहानिशा नौदलाकडून करण्यात आली.
मार्कोस कमांडोंनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाने जेव्हा कारवाईला सुरुवात केली तेव्हा जहाजावर अपहरण करणारे नव्हते. एमवी लीला नॉरफॉक जहाजाचं अपहरण झाल्याची माहिती गुरुवारी संध्याकाळी समोर आली होती. समुद्री डाकूंनी हे जहाज हायजॅक केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर भारतीय नौदलाने ताबोडतोब कारवाईला सुरुवात केली होती. भारतीय नौदलाचं आयएनएस चेन्नई कार्गो शिप तातडीने अपहरण झालेल्या जहाजाच्या दिशेला गेलं. भारतीय नौदलाने हायजॅकर्सला आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं होतं, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता.
भारतीय नौदलाचे प्रमुख एडमिरल आर हरि कुमार यांनी अरबी समुद्रात सक्रिय भारतीय युद्धनौकांना समुद्री लुटारुंच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय समुद्र हद्दीत असणाऱ्या व्यापारी जहाजांना अशा हल्लेखोरांपासून वाचवण्यासाठी भारतीय नौदलाने चार युद्धनौका अरबी समुद्रात तैनात केल्याची माहिती समोर आली आहे.