नवी दिल्ली – भारतीय रेल्वेला (Indian Railway)देशाची लाईफलाईन (lifeline) म्हणून ओळखले जाते. देशाच्या या जीवनवाहिनीतून दरदिवशी लाखो नागरिक प्रवास करतात. या रेल्वेत बसून अनेक जण आपल्या स्वप्नांच्या शहरात जातात. एकूणच देशात असलेले नागरिक आणि रेल्वे यांच्यात एक भावनिक संबंध आहे. या संबंधांव्यतिरिक्त सध्या भारतीय रेल्वे खात्याला प्रश्नांचा आणि टीकेचा सामना करावा लागतो आहे. रेल्वे प्रवासात वरिष्ठ नागरिकांना (senior citizens)देण्यात येणारी सूट रद्द केल्यामुळे, सध्या रेल्वे आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे. भारतीय रेल्वेच्या या निर्णयाविरोधात देशभरातून विरोधातील प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणात आता भारतीय रेल्वेने त्यांची बाजू समोर ठेवली आहे. यात समाज सेवा हेच भारतीय रेल्वेची जबाबदारी असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर तोटा होत असतानाही प्रवाशांना देत असलेल्या सुविधांबद्दलही रेल्वेने माहिती दिली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी संसदेच्या अधिवेशन काळातच भारतीय रेल्वेच्या खर्चाची माहिती दिली होती. त्यात त्यांनी सांगितले होते की – रेल्वेला एक किलोमीटर अंतर जाण्यासाठी 1रुपया 16 पैसे खर्च होतो. मात्र यासाठी प्रवाशांकडून केवळ 48 पैसे आकारले जातात. याच आधारावर भारतीय रेल्वेने आपल्या टीकाकारांसमोर आपली बाजू मांडली आहे. तसेच भारतीय रेल्वे देत असलेल्या सबसिडीमुळे बोत असलेल्या तोट्याची विस्तृत माहितीही रेल्वेने जाहीर केली आहे.
वरिष्ठ नागरिकांना देत असलेली सबसिडी बंद केल्याप्रकरणी, उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर रेल्वेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत भारतीय रेल्वेने काढलेल्या पत्रकारत, सर्व प्रकारच्या सबसिडींमुळे 2019-20 या सालात रेल्वेचे 64.523 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रकाशित केली आहे. याबाबत झालेल्या तोट्याची विस्तृत माहितीही देण्यात आली आहे. ज्यात रेल्वेने स्पष्ट केले आहे की अपेक्षित खर्चापेक्षा कमी भाडे वसूल केल्याने आणि सामाजिक बांधिलकी जपल्याने रेल्वेचे 2019-20 या सालात 45 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. एकूण विचार केला तर रेल्वे 116 पैसे खर्चाच्या तुलनेत प्रवाशांकडून केवळ 48 पैसे प्रति किलोमीटर भाडे आकारत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
होत असलेल्या नुकसानीचे सविस्तर विवरण भारतीय रेल्वेने दिले आहे. त्यात 2019-20 या सालात सबसिडीमुळे झालेल्या 64 हजार कोटी तोट्यापैकी 7 हजार कोटी रुपयांचे नुकसान हे उपनगरीय सेवांमधून होत असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. रेल्वे उपनगरीय सेवांमध्ये प्रवाशांकडून प्रति किमी केवळ 19 पैसे दरभाडे आकारीत यात प्रवाशांच्या भाड्यात देत असलेल्या सवलतींमुळे 2 हजार कोटींचे नुकसान, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मार्गांवर रेल्वे सेवा चालवल्याने 2400 कोटींचे नुकसान तर पार्सल, लगेज, पोस्टल आणि कॅटरिंग सेवेत झालेल्या नुकसानीमुळे, 5800 कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे.