नवी दिल्ली : भारतीय रेल्वे वेगाने आधुनिकतकडे वाटचाल करत आहे. रेल्वेमध्ये तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जात आहे. तंत्रज्ञानाद्वारे गाड्या अधिक सुरक्षित आणि वेगवान केल्या जात आहेत. यासोबतच तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रवाशांच्या सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. यामुळे लवकरच छापील तिकीट प्रणाली इतिहासजमा होणार की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डाने काढलेल्या एका आदेशानंतर छापील तिकिटांऐवजी नवीन पर्याय रेल्वे मंत्रालयाकडून येणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे.
काय आहे विशेष
भारतीय रेल्वेचा आपल्या दैनंदिन कामात तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा अधिकाधिक प्रयत्न होत आहे. रेल्वे आता आपली उर्वरित तिकीट छापखाने बंद करणार असल्याची बातमी आहे. त्यामुळे आगामी काळात रेल्वे तिकीट प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होईल का? अशी नवीन चर्चा सुरु झाली आहे.
रेल्वे मंत्री काय म्हणाले होते
2017 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सरकार तिकीट छपाईचे काम थर्ड पार्टीकडे म्हणजेच खाजगी क्षेत्राकडे देणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर हळहळू रेल्वे छापखाने बंद करणे सुरु झाले. भारतीय रेल्वेकडे एकूण 14 मुद्रणालये होती, त्यापैकी 9 बंद करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यानंतर रेल्वेकडे जी 5 छापखाने शिल्लक होती, तीही आता बंद होणार आहेत. याबाबतचे आदेश रेल्वे बोर्डाने विभागीय रेल्वेला दिले आहेत.
कोणती कारखाने बंद होणार
बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भायखळा (मुंबई), हावडा (कोलकाता), शकूरबस्ती (दिल्ली), रोयापूर (चेन्नई) आणि सिकंदराबाद येथील सध्याचे रेल्वे प्रिंटिंग प्रेस बंद केले जातील. या छापखान्यांमध्ये रेल्वेची आरक्षण आणि जनरल दोन्ही तिकिटे छापली जातात. तसेच रोख पावत्या आणि ४६ प्रकाराची कागदपत्रेही येथे छापण्यात येतात.
तिकीट पूर्ण डिजिटल होणार
रेल्वे आता तिकीट पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्या काउंटरवरून फक्त 19 टक्के तिकिटे खरेदी केली जात आहेत. त्याच वेळी 81 टक्के तिकिटे ऑनलाइन विकली जात आहेत. यामुळे सरकार डिजिटलला प्रोत्सहान देत असून छापील तिकिटे जवळपास बंद होणार आहे. लवकरच संपूर्ण डिजिटलायझेशनचे उद्दिष्ट गाठता येईल, असे रेल्वेला वाटते.