India maldive Row : भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. याची सुरुवात मालदीवनेच केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यादरम्यान मालदीवच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर मालदीवच्या या तिन्ही मंत्र्यांना निलंबित देखील करण्यात आले होते. त्यानंतर हा तणाव सुरु झाला. भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकला. अनेकांनी मालदीवला जाण्याचे नियोजन रद्द केले. त्यामुळे मालदीवमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली. याचा मालदीवला मोठा धक्का बसला. आता मालदीवच्या पर्यटन मंत्र्यांनी भारतीयांना मालदीवला भेट देण्याचे आवाहन केले आहे. मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. आधी मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीय लोकांची संख्या सर्वाधिक होती.
मालदीवच्या पर्यटनमंत्र्यांनी भारतीयांना त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पर्यटनमंत्र्यांनी भारत आणि त्यांच्या देशाच्या ऐतिहासिक संबंधांवरही भर दिला. 6 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या X हँडलवर प्राचीन लक्षद्वीपचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते, तेव्हा मालदीवच्या तीन मंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती. यानंतर भारतीयांनी मालदीवमध्ये जाण्यावर बहिष्कार टाकला होता.
मालदीवचे पर्यटन मंत्री इब्राहिम फैसल यांनी एका विशेष मुलाखतीत सांगितले की, आमच्या नवनिर्वाचित सरकारलाही भारतासोबत काम करायचे आहे. आम्ही नेहमीच शांतता आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचा प्रचार करतो. आमचे सरकार आणि लोक भारतीय पर्यटकांचे मनापासून स्वागत करतील. पर्यटन मंत्री या नात्याने मला भारतीयांना सांगायचे आहे की कृपया मालदीवच्या पर्यटनाचा एक भाग व्हा. आपली अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मालदीवला मोठ्या प्रमाणात लोकं आधी जात होते. ज्यामध्ये मोठ्या सेलिब्रिटींचा देखील समावेश होता. पण आता मालदीवच्या अर्थव्यवस्थेला भारतीयांनी चांगलाच सुरुंग लावला आहे. एकेकाळी अव्वल असलेली भारतीय पर्यटकांची संख्या आता सहाव्या क्रमांकावर पोहोचली.
मालदीवमध्ये सत्तेत आलेले मोहम्मद मुइज्जू हे चीन समर्थक आहेत. त्यामुळे ते सतत भारतविरोधी भूमिका घेताना दिसत आहे. पण असं असले तरी भारत मित्राप्रमाणे मालदीवला मदत करत आहे.