आणखी एका मुस्लीम देशासोबत भारताची घट्ट मैत्री, पाकिस्तानला लागली मिर्ची

| Updated on: Feb 15, 2024 | 4:59 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएई नंतर आणखी एका मुस्लीम देशाला भेट दिली. पंतप्रधान मोदींचा हा दौरा अचानक ठरला जेव्हा या देशाने भारताचे माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका केली. या माजी अधिकाऱ्यांनी आधी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर भारताने प्रयत्न सुरु केले आणि त्यांना सुखरुप भारतात आणले.

आणखी एका मुस्लीम देशासोबत भारताची घट्ट मैत्री, पाकिस्तानला लागली मिर्ची
Follow us on

PM modi in Qutar : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त अरब अमिरातचा दोन दिवसांचा दौरा संपवून आता कतारला पोहोचले आहेत. कतारला पोहोचताच पंतप्रधान मोदींनी कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांची भेट घेतली. अब्दुल रहमान हे कतारचे परराष्ट्र मंत्री देखील आहेत. पीएम मोदी म्हणाले की, भारत आणि कतारमधील संबंध दृढ होत आहेत. आम्ही भारत-कतार संबंधांचा आढावा घेतला आणि विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. यामुळे चीन आणि पाकिस्तानला मोठी मिर्ची लागली आहे.

भारत आणि कतार यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य

पीएम मोदी आणि शेख मोहम्मद यांच्यात व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. कतारचे पंतप्रधान म्हणाले की, आम्ही पंतप्रधान मोदींसोबत पश्चिम आशियातील प्रादेशिक घडामोडींवर चर्चा केली आणि शांतता आणि स्थिरता राखण्याबाबत भर दिला. बैठकीनंतर कतारचे पंतप्रधान आणि पीएम मोदी यांनी एकत्र जेवण देखील केले.

भारताची मुस्लिम देशांसोबत मैत्री

बुधवारी अबुधाबीमध्ये पहिल्या हिंदू मंदिराच्या उद्घाटनापूर्वी यूएई आणि भारत यांच्यात दहा करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. पीएम मोदींनी अबुधाबीमध्ये हिंदू मंदिराचे उद्घाटन करून दोन्ही देशांमधील मैत्री आणखी मजबूत केली आहे. दोन दिवसांचा दौरा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या कतार भेटीमुळे भारत आणि कतारमधील संबंधही दृढ झाले आहेत.

भारतीय नौदलाच्या माजी कर्मचाऱ्यांची सुटका

अलीकडेच कतारने आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांची सुटका केली, ज्यांना त्यांच्या अटकेनंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. भारतीयांची सुटका झाल्यानंतर काही दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कतार भेट झाली. या नौदलाच्या जवानांना कतार न्यायालयाने २६ ऑक्टोबर रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. आखाती देशातील अपील न्यायालयाने 28 डिसेंबर रोजी फाशीची शिक्षा कमी केली आणि त्यांना वेगवेगळ्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पीएम मोदींनी डिसेंबर 2023 मध्ये दुबई येथे COP28 शिखर परिषदेच्या बाजूला कतारच्या पंतप्रधानांची भेट घेतली होती.

पंतप्रधान मोदींचा कतार दौरा

भारत आणि कतारमध्ये व्यापार आणि ऊर्जा संबंध वाढत आहेत. कतार हा भारताला एलएनजीचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. गेल्या काही वर्षांत भारत-कतार यांच्यातील विविध क्षेत्रातील सहकार्य सातत्याने वाढत आहे. पंतप्रधान मोदींनी जून 2016 मध्ये पहिल्यांदा दोहाला भेट दिली. या भेटीमुळे दोन्ही बाजूंना सर्वोच्च पातळीवर गुंतवणुकीची आणि द्विपक्षीय संबंधांना नवीन चालना देण्याची संधी मिळाली.

मुस्लीम देशांमध्ये भारतासोबत मैत्रीसाठी चढाओढ

आखाती देशातील मुस्लीम देशांमध्ये भारतासोबत मैत्रीसाठी चढाओढ लागली आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे वर्चस्व वाढले आहे. भारत घेत असलेली भूमिका इतर देशांना देखील पटत आहे. भारतीय लोकं आणि भारतीय संस्कृती यामुळे भारताचे वर्चस्व मुस्लीम देशांमध्ये वाढले आहे. दुबई, यूएई सारखे देश आता भारतासोबत घट्ट मैत्रीसाठी प्रयत्न करत आहेत.