India maldive row : अनेकवेळा समान नावांमुळे गोंधळ उडतो. त्यामुळे एकचा राग कधी कधी दुसऱ्यावर देखील काढला जातो. असाच काहीसा प्रकार मॉरिशसच्या बाबतीत घडला आहे. मॉरिशस टुरिझमने भारतीय पर्यटकांना आपल्या देशात आमंत्रित करण्यासाठी सोशल मीडिया साइट X वर पोस्ट लिहिली आहे. पण यावर प्रतिक्रिया अशा आल्या की कदाचित मॉरिशसलाही अपेक्षा नसेल. मालदीवला कंटाळलेल्या भारतीयांनी चुकून मॉरिशसला फटकारले. एकाने लिहिले की, तुम्ही आमचा आणि आमच्या पंतप्रधानांचा आदर करत नाही, म्हणून आम्हाला तुमच्या देशात येण्यात रस नाही. एकाने लिहिले की, आम्हाला आमच्याच देशात एक चांगला पर्याय सापडला आहे.
मॉरिशस टुरिझम (इंडिया) ने सोशल मीडिया साइट X वर लिहिले की, मॉरिशस भारतीयांचे स्वागत करतो. 2024 मध्ये आमच्या बेटाची ऊर्जा अनुभवा. तुमच्यासाठी येथे हजारो साहसी गोष्टी आहेत, त्यामुळे आजच सुट्टीची योजना आखा. या पोस्टनंतरच कॉमेडी ऑफ एरर्स म्हणता येईल अशी मालिका सुरू झाली. भारतीयांनी भरपूर ट्विट केले. हा क्रम तेव्हा संपला जेव्हा मॉरिशस टुरिझमने पुन्हा लिहिले की, आम्ही मॉरिशस आहोत, मालदीव नाही.
भारत आणि मालदीवमध्ये तणावाचे वातावरण आहे. मालदीवमध्ये नवीन सरकार आल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष हे चीन समर्थक आहेत. त्यामुळे ते भारतासोबत पंगा घेण्याचं साहस दाखवत आहेत. पण याच मालदीवला भारताने अनेक वेळा मोठी मदत केली आहे. दुसरीकडे मालदीव चीनकडून आणखी कर्ज घेत आहे. ज्याबाबत त्यांना आधीच सतर्क देखील करण्यात आले आहे.
मालदीवमधील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली होती. ज्यानंतर त्यांची पदावरुन हकालपट्टी देखील करण्यात आली होती. पण या घटनेनंतर भारतीयांनी बॉयकॉट मालदीव सुरु केले होते. सोशल मीडियावरही ट्रेंड सुरु झाला होता. पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. भारतीय पर्यटक आता लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत आहेत. दुसरीकडे भारत सरकारने लक्षद्वीप बेटाचा विकास करण्यासाठी बजेटमध्ये देखील तरतूद करण्यात आली आहे.