Israel-Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम जगातील इतर देशांवर देखील होऊ शकतो. हा केवळ दोन देशांमधील संघर्ष नसून जगाभरातील देशांसाठी गंभीर इशारा आहे. इस्रायल आणि अरब देशांमधील वादामुळेच आज ही परिस्थिती ओढावली आहे. इस्रायल-हमास संघर्षाचा परिणाम जगावर होण्याची भीती आहे.
पॅलेस्टाईनला आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढता पाठिंबा हे याचं सर्वात मोठं कारण आहे. इस्रायलवर हमासचा हल्ला म्हणजे दहशतवादी हल्ला होता हे अनेक देश मान्य करायला तयार नाही. हे युद्ध अमेरिका, अरब आणि इतर सर्व देशांसाठी मोठे आव्हान बनले आहे. दहशतवादी संघटनांची वाढती ताकद ही धोक्याची घंटा आहे. जग दोन गटात वाटलं गेलं आहे. एक हमासला पाठिंबा देत आहेत आणि दुसरीकडे ते या युद्धाचा उपयोग आपली ताकद वाढवण्यासाठी करत आहेत.
भारतासाठी देखील ही धोक्याची घंटा आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. ज्यामुळे तणाव वाढू शकतो. दहशतवादी संधी साधण्याच्या तयारीत आहेत. दहशतवादाला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे अशी चुकीची माहिती आणि अपप्रचारापासून सावध राहण्याची गरज आहे.
अल कायदा, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात देखील अशा हल्ल्याची योजना आखू शकतात. त्यामुळे भारताला ही सतर्क राहण्याची गरज आहे. असे तज्ज्ञांचं मत आहे. इस्रायल-हमास युद्धाबाबत भारताने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे.
सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे अनेक देश इस्रायलच्या विरोधात भूमिका घेत आहेत. इस्रायल-पॅलेस्टीन संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हमास हे माध्यम असू शकत नाही. कारण ती एक दहशतवादी संघटना आहे. हमासने नागरिकांची हत्या केली. अनेक नागरिकांना ओलीस ठेवले आहे. ते माणवतेचे शत्रू आहेत हे जगातील अनेक देश आपल्या स्वार्थापोटी विसरुन गेले आहेत.