IPS Harshavardhan Biography: इंडियन पोलीस सर्व्हिसचे प्रशिक्षण पूर्ण करुन आपल्या पोस्टींगसाठी जाणाऱ्या आयपीएस हर्षवर्धन यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. कर्नाटक कैडरचा 2023 मधील आयपीएस असणारे हर्षवर्धन प्रशिक्षण पूर्ण करुन सरकारी वाहनाने पोस्टींगच्या ठिकाणी जात होते. त्यांच्या गाडीचा टायर फुटल्यामुळे चालकाने नियंत्रण गमावले. त्यानंतर एक घरावर आणि झाडावर जाऊन गाडी आदळली. त्यात डोक्याला मार लागल्यामुळे आयपीएस हर्षवर्धन यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षण पूर्ण करुन हर्षवर्धन कर्नाटकमधील होलेनरसीपूर येथे परिवीक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होण्यासाठी जात होते. त्यावेळी हासनपासून 10 किलोमीटर लांब असणाऱ्या किट्टाने या गावाजवळ रविवारी संध्याकाळी अपघात झाला. त्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या गाडीचा चालक मंजेगौडा याला किरकोळ दुखापत झाली आहे.
आयपीएस हर्षवर्धन यांनी नुकतेच म्हैसूर येथील कर्नाटक पोलीस अकादमीत चार आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. ते मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील दोसर गावाचे रहिवाशी आहे. त्यांचा परिवार बिहारमधील आहे. परंतु आई-वडील मध्य प्रदेशात राहत होते. त्यांचे वडील अखिलेश हे सबडिव्हीजनल मजिस्ट्रेट आहे.
अपघाताची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, जिल्हा सशस्त्र दलात राखीव असलेल्या वाहनाने हर्षवर्धन जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीचा टायर फुटल्यामुळे गाडी कलंडली. स्थानिक लोकांनी रेस्क्यू करत त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर ग्रीन कॉरिडोर करत बंगळूरु येथे घेऊन जाण्याची व्यवस्था केली. पंरतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
हर्षवर्धन यांनीअभियांत्रिकी पदवी पूर्ण केली होती. 2022-23 च्या कर्नाटक कॅडर बॅचचे ते आयपीएस अधिकारी होते. त्यांनी UPSC परीक्षेत 153 वा क्रमांक मिळवला होता. पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. हसनचे पोलिस अधीक्षक मोहम्मद सुजित आणि सहायक पोलिस अधीक्षक व्यंकटेश नायडू यांनी हॉस्पिटलला भेट दिली.